आज दि.१० डिसेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

तलाठी परीक्षेत गुणांची लॉटरी! चुकलेल्या प्रश्नांचे मिळणार ११४ गुण

प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याची बाब तलाठी परीक्षेतील उमेदवारांच्या चांगलीच पथ्यावर पडली आहे. या परीक्षेतील प्रश्नसुचीवर आक्षेप मागविण्यात आले होते. त्यात ११४ प्रश्न चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याचे तलाठी परीक्षा राज्य समन्वयकाकडून जाहीर करण्यात आले आहे.राज्यात ४ हजार ४४६ तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यातून १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज आले होते. प्रत्यक्षात ८ लाख ६४ हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अधिक संख्या असल्याने भूमी अभिलेख विभागाने तीन टप्प्यांत परीक्षा घेतली. परीक्षेची एकूण ५७ सत्रे पार पडली. २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान आक्षेप मागविण्यात आले. १६ हजार २०५ पैकी ९ हजार ७२ आक्षेप मान्य झाले. त्यातील ३२ प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले. तर ११४ प्रश्न किंवा उत्तरे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे पूर्ण गुण देण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली आहे. अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर होणार. त्यानंतर निवडसुची जाहीर केली जाईल, असे सूचित झाले.

अधिवेशनात थंडी तापणार; विदर्भाच्या तापमानात ४.३ अंशांची घसरण

मिग्जॉम वादळाच्या फटक्यातून आता विदर्भ सावरला आहे. रविवारी शहरात १२.९ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. चोवीस तासांत शहराच्या किमान तापमानात अचानक ४.३ अंशांनी घसरण झाल्याने नागपूरकरांचे स्वेटर, मफलर बाहेर निघू लागले आहेत. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विविध मोर्च्यामुळे राजकीय वातावरण तापत असताना सोबतच थंडीसुद्धा तापणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.

अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून वर्णी; ३ हजार मुलाखतींमधून निवड

अनेक वर्षांपासून रामभक्त वाट पाहात असलेला क्षण आता काही दिवसांवर आलेला आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिकांचं वाटप सुरू आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी उपस्थित असतील. गाझियाबादमधील विद्यार्थी मोहित पांडेला अयोध्या राम मंदिरातील पुजारी म्हणून निवडण्यात आलं आहे.मोहित पांडेनं दूधेश्वर वेद विद्यापीठात ७ वर्षे अभ्यास केला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो तिरुपतीला गेला. मंदिराचे पुजारी निवडण्यासाठी ३ हजार जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यातून ५० जणांची निवड करण्यात आली आहे. नियुक्तीआधी त्यांना ६ महिने प्रशिक्षण देण्यात येईल. राम मंदिरात पुजारी म्हणून मोहितची निवड झाल्याबद्दल दूधेश्वर नाथ मंदिराचे महंत नारायण गिरी यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसभा २०२४चं मिशन! मोदी-शहा-नड्डा राबवणार २०१७चा पॅटर्न? 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपैकी तीन निवडणुका भाजपनं जिंकल्या. मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखताना भाजपनं काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या छत्तीसगड आणि राजस्थानात बाजी मारली. पण या तिन्ही राज्यांमध्ये अद्याप भाजपला मुख्यमंत्र्यांची निवड करता आलेली नाही.लोकसभा निवडणुकाला अवघे काही महिने शिल्लक आहेत. भाजप हायकमांड तिन्ही राज्यांमध्ये नेतृत्त्व बदलाच्या तयारीत आहे. जुन्या चेहऱ्यांना संधी द्यायची असती तर भाजप नेतृत्त्वानं इतका वेळ घेतला नसता. यावेळी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. पण अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप तिन्ही राज्यांत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची दाट शक्यता आहे.

क्षेपणास्त्र चाचण्या कासवांसाठी स्थगित, DRDOचा महत्त्वाचा निर्णय

ऑलिव्ह रिडले जातीच्या सागरी कासवांच्या संवर्धनाचे मोठे आव्हान असून, त्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. जगण्यासाठीच्या या शर्यतीत या कासवांना बळ देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी, या कासवांच्या घरटी तयार करून अंडी घालण्याचा काळात, म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत ओडिशाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंड येथील क्षेपणास्त्रांच्या चाचण्या स्थगित करण्यात आल्या आहेत. ओडिशाचे मुख्य सचिव पी. के. जेना यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी यासंदर्भातील उपाययोजनांची घोषणा केली.

तेलंगणमध्ये महिलांना मोफत बसप्रवास; गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा

तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शनिवारी दोन योजना सुरू केल्या. या अंतर्गत महिलांसाठी मोफत बसप्रवास आणि गरिबांसाठी १० लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येणार आहे. या दोन्ही योजना काँग्रेसने जाहीर केलेल्या सहा निवडणूक ‘हमीं’चा भाग आहेत. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या योजना सुरू करण्यात येणार आहेत.

‘अॕनिमल’ चा धुमाकूळ

‘अॕनिमल’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचे सात दिवसांचे एकूण कलेक्शन ६६० कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत, रश्मिका पत्नीच्या भूमिकेत आणि बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

महिलेनं ४७ व्या वर्षी केलं लिंगपरिवर्तन, अलकाचा बनला अस्तित्व अन् प्रेयशीसी केला विवाह

मध्य प्रदेशात एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. ४७ व्या वर्षी महिलेनं लिंगपरिवर्तन करून प्रेयशीसी लग्नगाठ बांधली आहे. विशेष विवाह कायद्याअंतर्गत अस्तित्व सोनी ( पूर्वी अलका ) यानं आस्था या प्रेयशीसी कौटुंबिक न्यायालयात विवाह केला आहे. या विवाहसोहळ्याला अस्तित्व सोनी आणि आस्थाच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते.

इंदोर येथे अलका सोनी हिचा जन्म झाला होता. पण, काही वर्षानंतर अलकाला आपण स्त्री नसल्याची जाणीव झाली आणि पुरूष म्हणून वावरू लागला. अशातच ४७ व्या वाढदिवसाला अलकाने लिंगपरिवर्तन करून स्वत:चं नाव बदललं.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णू देव साय यांची निवड

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री विष्णू देव साय यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली आहे. आज भाजपाच्या बैठकीत साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३ डिसेंबर रोजी चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्यात भाजपाने तीन राज्यात बहुमताने विजय मिळविला. तरीही तीनही राज्यातील मुख्यमंत्री निवडण्यासाठी उशीर होत होता. अखेर सात दिवसांनी छत्तीसगडला नवा मुख्यमंत्री मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. रमण सिंह यांना आता भाजपाने बाजूला केल्याचे स्पष्ट होत आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.