चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात पुरात प्रवासी वाहन वाहून जात असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी यात वाहून जात होती. वाहनचालकाने टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात गाडी पुढे नेली.पाण्याचा प्रवाह जास्त असतानाही त्याने गाडी थांबवली नाही. त्याच्या हलगर्जीपणामुळे 5 प्रवाशांचा जीव धोक्यात होता.
या गाडीत एकूण 5 प्रवासी होते. जिल्ह्यात विविध तालुक्यात दिवसभर कमी-अधिक मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. ही गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. माहिती मिळताच गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सुटीवर गावात आलेले निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य सुरू केलं. स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका झाली. निखिल काळे या सैनिकाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत असल्यामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. तर काही ठिकाणी याच मुसळधार पावसामुळे राज्यात दाणादाण उडाली आहे. शेतामध्ये तळ्याचं रुप झाले आहे.
यवतमाळमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. तर शेतात 2 ते 3 फूट पाणी साचले आहे. यवतमाळमधील राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने वारा रोडवरील पिके पाण्याखाली गेली आहेत.
नांदेड जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. विष्णुपुरी धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि वरच्या भागातदेखील पाऊस झाला. त्यामुळे पाण्याचा ओघ वाढला आहे. आवक वाढल्याने विष्णूपुरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.