‘मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आणि शिवसेनेवर दावा’, मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधील 10 प्रमुख मुद्दे
राज्यातील सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली दौऱ्यात त्यांनी पहिल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार, ओबीसी आरक्षण, सुप्रीम कोर्टात सुरू असलेली लढाई या सर्व विषयांवर उत्तरं दिली.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
1) राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत. लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार आहे.
2) या सरकार स्थापनेत फडणवीसांचं मोठं योगदान आहे. नड्डा साहेबही संपर्कात होते. सेना भाजपने युतीत निवडणूक लढवली. त्यामुळे हे लोकांच्या मनातील सरकार आहे.
3) राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा देखील आवश्यक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन समजून घेणार आहोत. केंद्राची मदत मिळाल्यानंतर राज्य वेगाने प्रगती करते.
4) आषाढी एकादशीनंतर मुंबईत खातेवाटपावर चर्चा करणार. अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.
5) 50 खोके कसले मिठाईचे का? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला.
6) आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं की अन्याय सहन करायचा नाही. ही गद्दारी नाही तर क्रांती आहे.
7) सभागृहात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात होतो. सभागृहात सावरकारांबाबत बोलू दिले जात नव्हते.
8) अडीच वर्षापूर्वी जे सरकार स्थापन झालं होतं ते आता झालं. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही काहीही चुकीचं केलं नाही. आम्हीच शिवसेना आहोत हे लवकरच सिद्ध होईल.
9) ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको ही आमची भूमिका आहे. पावसळ्यात नगरपंचायतीच्या निवडणुका नको याबबत आयोगाशी चर्चा करणार.
10) महाराष्ट्राचे तुकडे व्हावे अशी कोणतीही चर्चा झाली नाही. काही जणांकडून दिशाभूल केली जाते.
बंडखोर आमदार संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात क्लीन चिट
शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले संजय राठोड यांना क्लिन चिट मिळाल्याचं स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं होतं की, संजय राठोड यांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात घेणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी क्लिन चिट दिलं आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी, इम्पिरिकल डेटा तयार, सरकारकडे सादर
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया समितीकडून इम्पिरिकल डेटा राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. बांठिया आयोगाकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे इम्पिरिकल डेटा सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींचं राजकीय मागासलेपण आहे का आणि तसेच आगामी काळात ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं की नाही याबाबतची माहिती देण्यासाठी बांठिया आयोगाकडे जबाबदारी दिली होती. बांठिया आयोगाने इम्पिरिकल डेटा तयार करुन मुख्य सचिवांकडे सादर केला आहे.
बुलढाण्यात माजी नगराध्यक्षाच्या पतीकडून फसवणूक, विकलेल्या जमिनीवर दोन कोटींचं कर्ज
लोकप्रतिनिधींना आपण समाजसेवक मानतो. त्यांच्याकडून जनतेचं भलं होईल, अशी अपेक्षा केली जाते. अर्थात अनेक लोकप्रतिनिधी जनतेच्या भावनांचा आदर करुन चांगले सामाजिक कार्यदेखील करतात. पण काही लोकप्रतिनिधी त्याला अपवाद असतात. काही लोकप्रतिनिधी जनतेला फक्त लुबाडण्याचं काम करतात. पण कायद्यासमोर सर्व सारखी असतात. त्यामुळे जनतेचं नुकसान करणारी माणसं कायद्यापासून लांब पळू शकत नाहीत.संबंधित प्रकरण हे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील आहे. माजी नगराध्यक्षांच्या पतीचं नाव कुणाल बोंद्रे असं आहे. चिखली तालुक्यातील ज्योती वाडेकर यांच्या नावे सर्वे नंबर १०३/५ मधील ३९२ चौरस फूट क्षेत्रफळाची जागा शेख हर्षद शेख इस्त्राईल यांच्याकडून 29 डिसेंबर 2003 रोजी खरेदी केली होती. या जमिनीच्या सातबारासाठी ज्योती या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडे गेल्या होत्या. या दरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुलायम सिंह यादव यांची पत्नी साधना गुप्ता यांचं शनिवारी निधन
देशातील बड्या नेत्याच्या पत्नीचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. समाजवादी पार्टीचे मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचं शनिवारी निधन झालं. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
यांच्या मुलाचं नाव प्रतिक यादव असून ते राजकारणात सक्रिय नाहीत. साधना गुप्ता बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना फुप्फुसात संसर्ग झाल्यानंतर मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलायम सिंह यादव यांनाही काही दिवसांपूर्वी आजारी असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
“मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”, गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर खोचक टीका
भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी अवस्था एकनाथ खडसे यांची झाली आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या विरोधाचा आधार घेत त्यांनी हा टोला लगावला आहे.
“सेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उरणार”, रावसाहेब दानवेंचा खोचक टोला
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेचे १२ खासदार संपर्कात असून येत्या काळात शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच उरतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न विचारला असता रावसाहेब दानवे बोलत होते.
महागाईवरून राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळात गॅस सिलिंडरच्या किमती 157 टक्क्यांनी वाढल्याचे राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटले. राहुल गांधी महागाईवरून सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत.तसेच पेट्रोल विक्रमी महाग झाले आहे. गब्बर सिंग टॅक्स आणि बेरोजगारीची सुनामी आहे.”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
श्रीलंकेत राष्ट्रपती भवनात घुसले आंदोलक; पंतप्रधानांनी बोलवली बैठक
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना त्यांच्या निवासस्थानातून पळ काढावा लागला आहे. शनिवारी मोठ्या संख्येने आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना हा निर्णय घ्यावा लागला. हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ही घटना घडली. हजारो आंदोलक त्यानंतर राष्ट्रपती भवनात घुसले.श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी त्यांच्या निवासस्थानातून पळ काढल्याचे बोलले जात आहे.
“राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल”, यशवंत सिन्हा यांची प्रतिक्रिया
विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.”मी राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यास काश्मीर प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, काश्मीरमध्ये शांतता, न्याय, लोकशाही, पुनस्थापित करण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीरमधील विकासात्मक कामे करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यासाठी सरकारला विनंती करेल. तसेच या कामाला माझे प्राधान्य असेल”, असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे.
‘शब्द काळजीपूर्वक वापरा,’ राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांना नरेंद्र मोदींचा सल्ला
राज्यसभेच्या नवनिर्वाचित २७ सदस्यांचा काल शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांशी संवाद साधला. यावेळी वरिष्ठ सभागृहात नियमित राहावे, सभागृहात तयारी करुन यावे तसेच शब्द जपून वापरावेत, असा सल्ला मोदी यांनी या खासदारांना दिला. राज्यसभेत निवड झालेल्या खासदारांमध्ये नीर्मला सीतारामन, पीयुष गोयल अशा भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
भारताचे आजी-माजी कर्णधार करणार एकाच विक्रमाचा पाठलाग; कोण मारणार बाजी?
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर देण्यात आली. रोहित शर्मानेही आतापर्यंत ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेला पहिला टी २० सामना जिंकून रोहित सलग १३ टी २० सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करण्याचीही कामगिरी केली. आता इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यातही त्याला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार विराट कोहलीदेखील त्याच्यासोबत स्पर्धा करताना दिसणार आहे.
SD Social Media
9850 60 3590