सुनील मानेच्या मोबाईल मध्ये चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा नकाशा

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) केला आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली.

या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. त्याने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावं. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.

मनसुख हिरेन यांना भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला. मनसुख यांना दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केलं. ज्यामध्ये विनायक शिंदे होता. त्यानेच मनसुख यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले. त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरु केला, जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखचं शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळावं आणि तपासाची दिशा भरकटली जावी. सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास एनआयएकडून सध्या केला जात आहे. एटीएस या प्रकरणात तपास करत असतानाच सुनील मानेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करणार होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र त्यापूर्वीच तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.