हवामानातील बदलांमुळे यंदा देवगडसह कोकणपट्टय़ात सरासरीच्या २५ टक्केही आंबा उत्पादन होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जेमतेम एप्रिलच्या मध्यापर्यंतच कोकणचा हापूस बाजारात दिसेल. त्यानंतर खवय्यांना कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरातच्या आंब्यांवर समाधान मानावे लागणार आहे.
‘‘डिसेंबर-जानेवारी या मोहोर येण्याच्या काळात रात्री थंडी आणि दिवसा ऊन अपेक्षित असते. यंदा दिवाळीपासून डिसेंबपर्यंत थंडी पडली नाही. डिसेंबरअखेर काही दिवस थंडी पडली. त्यामुळे काही झाडांना मोहोर आला; पण तो अत्यंत कमी होता. शिवरात्रीच्या काळात उष्णतेची लाट आली. या लाटेत लागलेला आंबाही पिवळा पडून गळून पडला. रायगड , रत्नागिरी, देवगडमध्ये हीच स्थिती होती. त्यामुळे देवगडसह कोकणपट्टय़ात झाडावर आंबा राहिलेला नाही’’, असे कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेता संघाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी सांगितले.
‘‘१ मार्चपासून देवगडमधील आंबा आणि दहा-बारा मार्चपासून राजापूर, रत्नागिरीचा हापूस हंगाम सुरू होतो. पाडव्याला आंब्याचे दर तेजीत असतात. पाडव्यानंतर आंब्याची आवक वाढते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून आंब्याचे दर कमी होऊन हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतो. यंदा मात्र पाडव्यानंतर आवक अत्यंत कमी राहिली. आता कोकणातून बाजारात येणारा हापूस आंबा नगण्य असेल. त्याचा परिणाम निर्यातीवरही होणार आहे. निर्यातीसाठीचा दर्जेदार आंबा कोकणात राहिलेला नाही. पाचशे झाडांच्या बागेत जेमतेम वीस-पंचवीस झाडांना आंबा आहे, असे चित्र आहे. हवामान बदलामुळे सरासरीच्या तुलनेत आंबा उत्पादनात सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घट येणार आहे’’, असेही भिडे म्हणाले.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संजय पानसरे म्हणाले, ‘‘सध्या बाजारात कोकणातील हापूस ६० टक्के आहे. दहा एप्रिलनंतर त्यात मोठी घट होईल. दुसऱ्या टप्प्यात बाजारात कोकणातील हापूस अत्यंत कमी असेल. सध्या बाजारात कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गुजरातमधील हापूस, बदामी आंबा येत आहे. एप्रिलअखेरपासून परराज्यांतील आंब्यांची आवक वाढेल. हापूस आंब्याअभावी यंदा निर्यातीचे गणित बिघडू शकते. व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून निर्यातक्षम आंबा खरेदी करीत नाहीत. वाशी बाजारात येणाऱ्या आंब्यांतून दर्जेदार आंबा वेचून निर्यात केला जातो.’’
पुढील आठवडय़ात हापूसची अमेरिकावारी शक्य
अमेरिकेचे तपासणी अधिकारी सोमवारी, नऊ एप्रिल रोजी मुंबईत येतील. त्यानंतर बुधवार, १२ एप्रिलपासून अमेरिकेला निर्यात सुरू होऊ शकते. जास्तीतजास्त हापूस आंबा निर्यातीचे नियोजन आहे. मात्र, कोकणपट्टय़ात निर्यातक्षम दर्जाच्या आंब्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. आखाती देश, सिंगापूर सारख्या देशांना यापूर्वीच निर्यात सुरू झाली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक भास्कर पाटील यांनी दिली.