राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोळे धर्मांतराच्या विषयावर भाष्य करतांना म्हणाले की, धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे असं संघाचे कायमच मत राहिलेलं आहे. आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या वार्षिक बैठकीत शनिवारी ते बोलत होते. कर्नाटकातील धारवाडमध्ये तीन दिवसांपासून ही बैठक सुरू होती. या वार्षिक बैठकीचा शेवटचा दिवस होता.
होसाबोळे म्हणाले की, कोणी स्वेच्छेने निर्णय घेत असेल तर गोष्ट वेगळी, पण तसे होत नाही. मग धर्मांतर करणारे दुहेरी लाभ कसे घेऊ शकतात? आता पर्यंत 10 हून अधिक राज्यांच्या सरकारांनी धर्मांतरविरोधी विधेयके आणले आहेत. ही सर्व सरकारे भाजपची नाहीत. हिमाचल प्रदेशामध्ये वीरभद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने हे विधेयक फार पूर्वी मंजूर केले. अरुणाचल प्रदेश काँग्रेसने धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर केले.
तीन दिवसीय बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. महागाई- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, अपारंपरिक ऊर्जा/ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांच्या वापरावर, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आसे विषय मांडले गेले.
होसाबोळे यांनी बैठकीत सांगितले की, संघ पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे, मात्र केवळ दिवाळीतच फटाक्यांवर बंदी घालणे हा प्रश्नावर उपाय नाही. इतर देशांमध्येही सणाच्या वेळी फटाके वाजवले जातात. अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रीय दिनी न्यूयॉर्कमध्ये फटाके फोडले जातात. होसबोले म्हणाले की, फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहेत आणि लोकांचा आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे फटाके बंदीचा निर्णय संबंधित मंत्रालय आणि पर्यावरणतज्ज्ञांशी चर्चा करूनच घ्यावा, असं ते म्हणाले.