आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचं निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने एका संघर्ष युगाचा अंत झाल्याची भावना जगभरात व्यक्त केली जात आहे.
1990च्या दशकात डेसमंड टूटू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. डेसमंड टूटू यांच्या निधनावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांनी शोक व्यक्त केला आहे. आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टूटू यांच्या निधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लढवय्या आणि शूर पिढीचा अंत झाला आहे. त्यांनी वर्णभेदाविरोधात लढा देऊन आम्हाला एक नवीन दक्षिण आफ्रिका दिला. ते मानवाधिकाराविरोधात लढणारे यूनिव्हर्सल चॅम्पियन होते, अशी शोक भावना रामफोसा यांनी व्यक्त केली आहे. मात्र टूटू यांच्या निधनाचं नेमकं कारण त्यांनी स्पष्ट केलं नाही.
डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. त्यांना देशाची नैतिक कम्पास (Country’s Moral Compass) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली. रंगभेदाविरोधात अहिंसक लढा उभारल्याबद्दल त्यांना 1984मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
1986मध्ये केपटाऊनमध्ये ते पहिले आर्चबिशप बनले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारशी चर्चा झाल्यानंतर 1990मध्ये नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतर वर्णभेदाविरोधातील कायदा संपुष्टात आणला गेला. 1994 मध्ये विजयी झाल्यानंतर राष्ट्रपती मंडेला यांनी मोठा निर्णय घेतला. वर्णभेदाच्या काळात मानवाधिकाराचं हनन झालं होतं. त्याची चौकशी करण्यासाठीच्या आयोगाचं नेतृत्व डेसमंड यांच्याकडे सोपवण्यात आलं. 2007मध्ये भारत सरकारने डेसमंड यांना गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवलं होतं.