लसीकरणाचा वेग अधिक
वाढविण्याची गरज : मुख्यमंत्री
कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत. सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
नागपुरात २८ फेब्रवारीला होणार
राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून, २८ फेब्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू होणार आहेत. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. पुढील अधिवेशन हे नागपुरात घेण्यात यावं अशी मागणी सातत्याने समोर येत होती. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत होत असल्याने ही मागणी अधिकच जोर धरत होती.
६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना
बूस्टर डोस दिले जाणार
आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले होते. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान, आता ६० वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आवाजी
मतदानाला राज्यपालांचा विरोध
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती आहे.
तेलंगणा आणि छ्त्तीसगड सीमेवर
चकमक सहा नक्षलवादी ठार
तेलंगणा आणि छ्त्तीसगड सीमा भागातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील पेसलपाडू जंगल परिसरात सोमवारी पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. या चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. भद्राद्री कोठागुडेमचे एसपी सुनील दत्त यांनी सांगितले की, तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातील किस्ताराम पीएस सीमेवरील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेले. ऑपरेशन अजूनही सुरू आहे, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.
जे लोक अस्वस्थ असतात ते अशा
प्रकारची विधानं करतात : शरद पवार
चंद्रकांत पाटील यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली आहे असं सांगण्यात आलं असता शरद पवार म्हणाले की, “नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात,” असा टोला शरद पवारांनी लगावला.
मदर तेरेसा यांच्या संस्थेची खाती
गोठवली 22 हजार रुग्णांची उपासमार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ख्रिसमसच्या काळात मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या संस्थेची भारतातील सर्व खाती गोठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकारच्या या निर्णयामुळे या संस्थेतील जवळपास २२ हजार रूग्ण आणि कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच त्यांना कोणत्याही औषधांविना रहावं लागेल, असं मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
कॉमेडियन आणि अभिनेते
मुश्ताक मर्चंट यांचे निधन
बॉलिवूड चित्रपटांमध्ये लोकप्रिय असलेले कॉमेडियन आणि अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचे निधन झाले आहे. मुश्ताक मर्चंट यांचे आज २७ डिसेंबर रोजी मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून मधुमेहाशी लढा देत होते. मुश्ताक यांनी १६ वर्षांपूर्वी अभिनय सोडला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला धार्मिक कामात व्यस्त केले. त्यांचं अंतिम संस्कार हे पूर्ण धार्मिक परंपरेने केले जाणार आहे.
SD social media
9850 60 3590