पाण्याच्या बाटलीत दिलं अॅसिड, रेस्टॉरंटमधील बर्थ डे पार्टीतला धक्कादायक प्रकार
हल्ली वाढदिवस, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढलाय. जंगी पार्टीचं आयोजन करून, छान सजावट आणि जेवणाचे विविध पदार्थ पार्टीतल्या सगळ्यांसाठी केले जातात. मुलांचे वाढदिवस असतील तर त्यानुसार म्युझिक, डान्स, फोटोसेशन आणि भरपूर जेवण अशी एकंदरीत पार्टीची थीम असते. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण दिलं जातं आणि पार्टी एंजॉय केली जाते. अशाच एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये मुलांना अॅसिड प्यायला दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पाकिस्तानमधील लाहोरमधून ही घटना समोर आली आहे. या मुलांना पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत अॅसिड देण्यात आलं. त्या अॅसिडमुळे दोन मुलांची तब्येत खराब झाली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दोघांपैकी एकाने हे पाणी प्यायलं होतं तर एकाने या पाण्याने हात धुतले होते.
कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियाला रामराम
प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकीची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. त्याच्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी चाहते खूप गर्दी करतात. याशिवाय तो त्याच्या गाण्यांमुळेही चर्चेत असतो. मात्र काही दिवसांपासून मुनव्वर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मुनव्वर आणि त्याची गर्लफ्रेंड नझिलाचं ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्याचं दिसत आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
मुनव्वर फारुकीनं ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हडिओमध्ये त्यानं सांगितलं की तो सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. मात्र हा ब्रेक किती दिवसांसाठी घेणार आहे याविषयी त्यालाही काही कल्पना नाही. काही वैयक्तिक कारणांमुळे तो सोशल मीडियाला रामराम करत आहे. त्याच्या या निर्णयानं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
माजी मंत्री मधुकर पिचड दवाखान्यात दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ८१ वर्षीय पिचड यांचा रक्तदाब अनियमित झाल्याचे सांगण्यात आले आहे.
निधीअभावी आरोग्य विभाग कुपोषित, दुप्पट निधी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने निर्माण झाला आशेचा किरण
राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये आतापर्यंतच्या सरकारने आरोग्य विभागाने अर्थसंकल्पात मागितलेला निधी दिला नाही वा वेळेवर दिलेला नाही. परिणामी आरोग्य विभागाच्या अनेक योजना व कामे रखडतात तसेच त्यांना कात्री लावावी लागते. निधीअभावी आरोग्य विभागाची कुपोषणाकडे वाटचाल सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दुप्पट निधी दिला जाईल अशी घोषणा केल्यामुळे आशेचा किरण निर्माण झाला आहे. मात्र ही घोषणा सत्यात येईल का, याबाबत आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात ठाकरेंना आणखी धक्के देणार?
महाराष्ट्रासाठी उद्या खूप मोठा दिवस आहे. कारण उद्या विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण सर्वत्र साजरा होणार आहे. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने विचारांचे सोनं लुटण्यासाठी शिवसेनेकडून दरवर्षी दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. पण सध्याची राजकीय पार्श्वभूमी काहीशी वेगळी आहे. कारण शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे आणि शिवसेनेचे दोन गट निर्माण झाली आहे. एक शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील आहे. तर दुसरी सेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी मिळाली आहे. खुद्द मुंबई हायकोर्टाने शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. या मेळाव्याच्या एक दिवस आधी शिंदेंनी मोठं विधान केलं आहे. “कोण कोणाबरोबर आहे हे उद्या कळेल”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
‘आम्ही शिवसेनेचे मानकरी’ शिंदे गटाने काढलं गाणं, सेनेला डिवचलं!
दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून एक गाणं साकरण्यात आलं आहे. या गाण्यात आम्हीच शिवसेनेचे मानकरी असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असून या मेळाव्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गटाचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्यासाठी खास शिवसेना स्फुर्तिगीत तयार करण्यात आले आहे. आज हे गीत सर्वासाठी रिलिज करण्यात आले.
एकनाथ शिंदेंचा शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला धक्का, ठाण्यातला ‘मोठा मासा’ गळाला!
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाचा सगळ्यात मोठा फटका उद्धव ठाकरे यांना ठाण्यात बसला आहे. ठाणे जिल्ह्यातली शिवसेना एकनाथ शिंदे यांनी जवळपास आपल्या पाठीशी असल्याचं दाखवून दिलं आहे, यानंतर आता त्यांचं पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं बोललं जात आहे, आणि आता घडामोडीही त्याच दिशेने व्हायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे म्हात्रे यांनी त्यांचा राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला आहे. म्हात्रे यांच्या राजीनाम्याने ठाणे जिल्हा ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी हानी होणार आहे. आपण आपल्या वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
काही काँग्रेस नेत्यांकडून मला रोखण्याचा प्रयत्न, राहुल गांधींनी…; शशी थरुर यांचा गौप्यस्फोट
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत खासदार शशी थरुर आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान, शशी थरुर यांनी पक्षातील काही नेते आपल्याला निवडणूक लढण्यापासून रोखू इच्छित आहेत. यासाठी त्यांनी राहुल गांधींशी चर्चाही केली होती असा गौप्यस्फोट केला आहे. पण राहुल गांधी यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने आज उतरणार मैदानात, संघात बदल होण्याची दाट शक्यता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. टी२०विश्वचषकापूर्वी हा टीम इंडियाचा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून थेट विश्वचषकात सामील व्हायचे असा रोहित अॕण्ड कंपनीचा इरादा असेल. विराट आणि केएल राहुलसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंना संघात खेळण्याची मोठी संधी आहे.
SD Social Media
9850 60 3590