पहिले स्वदेशी हेलिकॉप्टर वायूसेनेत दाखल, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे भरणार शत्रूला धडकी!

देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. लष्करामध्ये आधी दाखल झालेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच) आता हवाई दलातही अधिकृतरित्या दाखल झाली आहेत. सैन्यदलाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते ही हेलिकॉप्टर्स काल (3 ऑक्टोबर 22) हवाईदलात समाविष्ट करण्यात आली. सीमेजवळील जोधपूरमध्ये ही हेलिकॉप्टर्स तैनात केली जाणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स स्वदेशी बनावटीची आहेत, हे त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. या एलसीएचची आणखी काय काय वैशिष्ट्यं आहेत, या विषयी ‘एबीपी लाईव्ह’नं सविस्तर वृत्त दिलं आहे.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीनं तयार केलेली लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर ही देशातील पहिली स्वदेशी बनावटीची अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षणविषयक कॅबिनेट समितीनं मार्च महिन्यात 15 स्वदेशी लाईट अटॅक हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली होती.

त्या पार्श्वभूमीवर एचएएलनं दोन लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर एलसीएच एव्हिएशनकडे सोपवल्याचं भारतीय सैन्य दलानं गुरुवारी सांगितलं होतं. ही सर्व 15 हेलिकॉप्टर्स 3387 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत. त्यापैकी 5 हेलिकॉप्टर्स लष्करासाठी व 10 हवाई दलांसाठी आहेत. लष्करामध्ये याआधीच हे हेलिकॉप्टर दाखल झालं आहे.

– अमेरिकेकडून घेतलेल्या अपाचे हेलिकॉप्टरचं वजन 10 टन आहे, त्या तुलनेत एलसीएच हलकं असून, त्याचं वजन 6 टन आहे. यामुळे जास्त उंचीवरही क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्र घेऊन टेक ऑफ आणि लँडिंग करता येऊ शकतं.

– एलसीएचमध्ये 70mm चे 12-12 रॉकेटचे दोन पॉड बसवले आहेत.

– एलसीएचच्या पुढच्या भागात 20mmची बंदूक बसवण्यात आली आहे. ती 110 अंशात कोणत्याही दिशेनं फिरू शकते.

– फ्रान्समधून घेतलेलं ‘मिस्ट्रल’ एअर टू एअर म्हणजे हवेतून हवेत मारणारे क्षेपणास्त्र व हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आहे.

– पायलटच्या हेल्मेटवरच कॉकपीटमधील सगळी फीचर्स डिस्प्ले होतील, अशा पद्धतीनं ते तयार केलं आहे.

– कारगिल युद्धानंतर अशा पद्धतीची स्वदेशी हेलिकॉप्टर तयार करण्याचा भारताचा मनसुबा होता. शत्रूचे 15-16 हजार फूट उंचीवरील बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेलं हेलिकॉप्टर त्यावेळी भारताकडे नव्हतं. 2006मध्येच या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.

– 15 वर्षांच्या मेहनतीनंतर आता देशाला लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स मिळाली आहेत.

एलसीएचमध्ये असलेल्या स्टेल्थ फीचर्समुळे हे हेलिकॉप्टर शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसू शकत नाही. शत्रूच्या हेलिकॉप्टरनं एलसीएचवर क्षेपणास्त्र लॉक केलं, तरी त्याला चुकवण्याची क्षमता एलसीएचकडे आहे. या हेलिकॉप्टरचं बाहेरचं कवच चिलखती आहे. त्यामुळे गोळीबाराचा फारसा परिणाम होणार नाही. याच्या पंखांवरही गोळीबाराचा परिणाम होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.