इस्रोच्या बहुचर्चित मंगळयान मोहिमेचा तब्बल आठ वर्षांनी काल (2 ऑक्टोबर 2022 रोजी) शेवट झाला. मार्स ऑर्बिटर मिशन यानाचा इस्रोशी संपर्क तुटला आणि मोहीम संपली. केवळ सहा महिन्यांसाठी पाठवण्यात आलेल्या या यानाने तब्बल 8 वर्षं 8 दिवस काम केलं. ही मोहीम आणि मंगळयानाबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
भारत मंगळयान प्रक्षेपित केल्यानंतर मंगळ ग्रहावर पोहोचण्यासाठी मोहीम सुरू केलेल्या जगातील मोजक्या देशांपैकी एक बनला. सुमारे 11 महिने प्रवास केल्यानंतर मंगळयान मंगळाजवळ पोहोचलं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची ही सर्वांत मोठी कामगिरी होती. यापेक्षाही अभिमानास्पद बाब म्हणजे पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या अंतराळ संस्थेने आपलं अंतराळ यान मंगळावर नेत ते त्याच्या कक्षेत सेट केलं होतं, त्यामुळे जगभरात इस्रो व देशाचा गौरव झाला होता.
मंगळयानाबद्दलच्या सात महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.
1. मंगळयान सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी पाठवलं होतं; पण ते मंगळयान तब्बल आठ वर्षं आठ दिवस कार्यरत राहिलं. ते शेवटच्या श्वासापर्यंत लाल ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलं. हे कोणत्याही वैज्ञानिक चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. मंगळयानाने भारतासाठी खूप महत्त्वाची कामगिरी केली.
2. त्याने कधी मंगळाचे सर्वांत दुरून फोटो घेतले. कधीकधी त्याच्या अगदी जवळ जाऊन फोटो घेतले. म्हणजेच एलिप्टिकल ऑर्बिट जॉमेट्रीपासून ते सर्वांत जवळच्या बिंदूपर्यंत त्याने फोटो काढले आणि याच ऑर्बिटमुळे इस्रोचे शास्त्रज्ञ मंगळाचा संपूर्ण डिस्क मॅप बनवू शकले.
3. एवढंच नव्हे तर मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या चंद्र डिमोसचा सर्वांत पहिला फोटो तेव्हा घेतला होता, जेव्हा तो मंगळ ग्रहाच्या अंडाकार ऑर्बिटमध्ये सर्वांत दूर प्रदक्षिणा घालत होता. याआधी देशात कोणीही डिमोसचा फोटो पाहिला नव्हता.
4. मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेऱ्याने 1100 हून अधिक फोटो पृथ्वीवर पाठवले. ज्याच्या मदतीने इस्रोने मार्स अॕटलास तयार केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला मंगळावरील विविध ठिकाणांचे फोटो पाहता येतात आणि त्याबद्दल माहिती जाणून घेता येते. मंगळयान आणि त्यावर 35 हून अधिक रिसर्च पेपर आतापर्यंत पीअर रिव्ह्युड जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
5. एवढी मोठी मोहीम फक्त 450 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होऊ शकेल, असा देशातील शास्त्रज्ञांनी आणि इस्रोने कधीही विचार केला नव्हता. या मोहिमेचं बजेट हे हॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षाही कमी होतं. शिवाय पहिल्याच प्रयत्नात इस्रो मंगळावर आपलं अंतराळ यान पाठवण्यात यशस्वी ठरेल, याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. अमेरिका, रशिया आणि युरोपसारखे देश अनेक अपयशांनंतर मंगळावर पोहोचू शकले. मात्र, भारताने पहिल्याच प्रयत्नात ही कामगिरी केली. मंगळयान पहिल्याच वेळेत मंगळावर पोहोचल्याने जगभरात इस्रोचा आदर आणि महत्त्व वाढलं. यानंतर त्यांना वेगवेगळ्या देशांचे सॅटेलाइट लाँच करण्याच्या जास्त ऑर्डर मिळू लागल्या.
6. इस्रोला अनेक स्पेस कॉमर्स, सर्व्हिस आणि सॅटेलाइट इमेजरीच्या डील्स मिळाल्या. केवळ एका मोहिमेचा इस्रोला खूप मोठा फायदा झाला. मंगळयान हे केवळ एक वैज्ञानिक मिशन नव्हतं, तर ही देशासाठी अभिमानाची बाब होती. मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, माध्यमांसाठी आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान समुदायासाठी हा एक अभ्यासाचा विषय बनला होता. भारतातील तरुण पिढीमध्ये विज्ञान आणि इस्रोविषयी कुतूहल वाढलं. सुमारे तीन वर्षं देशात फक्त मंगळयान आणि इस्रोवर चर्चा झाली आणि त्यासंबंधित बातम्या प्रसिद्ध होत राहिल्या. इस्रोच्या इतर मोहिमांबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढली. एका मोहिमेनं इस्त्रोचं महत्त्व आणि अंतराळासंबंधित विषयाची आवड कैकपटीनं वाढली.
7. मंगळयानाने या मोहिमेदरम्यान कोणता वैज्ञानिक अभ्यास केला का? याबद्दल सांगायचं झाल्यास मंगळयानाने सौर ऊर्जेशी संबंधित सोलर डायनॅमिक्सचा अभ्यास केला. मंगळाच्या वातावरणातून संपूर्ण ग्रहावर आलेल्या धुळीच्या वादळांचा अभ्यास केला. मंगळाच्या अॅक्सोस्फियरमध्ये हॉट ऑर्गनचा शोध घेतला. मंगळाच्या पृष्ठभागाच्या 270 किमीवर किती प्रमाणात ऑक्सिजन आणि CO2 आहे, हेही मंगळयानातील MENCA उपकरणाने सांगितलं.
मंगळयानाच्या मदतीने लागलेल्या शोधां काय उपयोग?
मंगळयानाने गोळा केलेल्या माहितीच्याआधारे देशातील आणि जगातील शास्त्रज्ञ संशोधन आणि अभ्यास करू शकतात. देशातील शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी मंगळावर इस्रोकडून मिळालेल्या डेटा, कागदपत्रं आणि अहवालांवर थिसीस तयार करू शकतात.
काय करता येणार नाही?
1. मंगळ ग्रहाशीसंबंधित डेटासाठी भारताला अमेरिका, युरोप किंवा इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल.
2. जोपर्यंत नवीन मंगळयान म्हणजेच मंगळयान-2 मंगळावर जात नाही, तोपर्यंत मंगळावरून कोणतीही बातमी मिळणार नाही.
3. कोणताही नवीन नकाशा तयार करता येणार नाही, तसंच कोणताही नवीन रिसर्च करता येणार नाही.
इस्रोने 5 नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटा येथून 2013 मध्ये हे यान मंगळाच्या दिशेने प्रक्षेपित केलं होतं. 24 सप्टेंबर रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचलं होतं. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रोने इतिहास रचला आहे.