केंद्रीय मंत्री नारायण राणे हे ठाण्याच्या टेंभीनाक्यावरच्या नवरात्रोत्सवात देवीचं दर्शन घेण्यासाठी आले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्याच्या टेंभीनाका नवरात्रोत्सवात येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही देवीचं दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान टेंभीनाक्याच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.
40 म्हैशासूरांचे वध कर, असं मागणं अंबादास दानवे यांनी देवीकडे मागितलं होतं, त्यांच्या या वक्तव्याचा नारायण राणे यांनी समाचार घेतला. असं वक्तव्य करणारे मूर्ख आहेत. देवीने त्यांचा वध केला आणि खरी शिवसेना शिंदेंकडे देवीने दिली, असं नारायण राणे म्हणाले.
‘मी दरवर्षी टेंभीनाका देवीच्या दर्शनला येतो. आतापर्यंत एकच दसरा मेळावा पाहिला होता, आता दोन मेळावे होत आहेत, पण आता खरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असेल. मला बोलावलं तर मी बीकेसीच्या दसरा मेळाव्याला जाईन, तसंच पक्षाने परवानगी दिली तर मी शिंदेंच्या मेळाव्याला जाईल,’ असं नारायण राणे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे गटाला पाठिंबा दिला आहे, पण त्याने फरक काय पडतो? राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये ताकद काय आहे? असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मुंबईतलं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे, कारण वांद्र्याच्या बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा तर दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याआधी दोन्ही गटांकडून एकमेकांवर ट्रेलरच्या माध्यमातून निशाणा साधण्यात येत आहे. दसरा मेळाव्याला पक्षामध्ये आणखी काही जणांचे प्रवेश होतील, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या गौप्यस्फोटामुळे शिंदे गटात सामील होणारे ते नेते कोण? याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे.