सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मान्सूनच्या परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. दरम्यान काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. परंतु मान्सून परतीचा प्रवास काहीसा अडखळत सुरू असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान सध्या परतीचा पाऊस वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राचा काही भागासह मध्य भारताच्या काही भागांतून मान्सून परतल्याचे हवामान विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.
यंदा दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिरा मान्सूनने वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. 20 सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. परंतु आठवडाभरापेक्षा अधिक काळ मान्सूनच्या परतीची स्थिती तशीच राहिल्याने परतीचा पाऊस मंद गतीने जात असल्याचे दिसून येत आहे. 29 सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाच्या प्रवासाला पुन्हा सुरूवात झाल्याने संपूर्ण पंजाब, चंदीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागांतून परतला होता.
दरम्यान काल (दि. ३) राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाखसह संपूर्ण वायव्य भारतातून मान्सून परतला आहे. तर उत्तर अरबी समुद्रासह गुजरातचा बहुतांश भाग, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंड राज्याच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंत मान्सूनच्या परतीची सीमा असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईत पावसाचा इशारा…
दरम्यान, 6 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत मात्र शहरातील तुरळक ठिकाणी 15.5 मिमी ते 64.4मिमीपर्यंत पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात 5 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत 32 ते 33 अंशांच्या आसपास कमाल तापमान राहील. या काळात ढगाळ वातावरण, हलका पाऊस किंवा शिडकाव्याची शक्यता आहे. त्यामुळे उकाड्याची जाणीवही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात गुरुवारनंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.