भाजपाला देशाचे ऐक्य नको हे
शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितले
भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
सध्या कोणतेही नवीन निर्बंध
लावले जाणार नाही : राजेश टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात मोठं विधान केलं आहे. “राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाही,” असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. तसेच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आलीय. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असंही टोपे यांनी सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.
ओमायक्रॉन 59 देशांमध्ये पसरला
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये ओमायक्रॉन प्रकाराचे प्रकरण समोर आले. ज्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तो टांझानियाहून परतला होता. हा प्रकार आतापर्यंत एकूण 59 देशांमध्ये पसरला आहे. एकूण 2936 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 24 नोव्हेंबर रोजी, दक्षिण आफ्रिकेच्या गोटेंग प्रांतात या प्रकाराची पहिली केस नोंदवली गेली. ओमायक्रॉनला 26 नोव्हेंबर रोजी WHO ने चिंतेचा प्रकार म्हणून घोषित केले होते.
मंत्री अनिल परब एसटी कर्मचाऱ्यांच्या
संदर्भात अपयशी ठरले : पडळकर
गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. “परिवहन मंत्री अनिल परबांनी आपलं अपयश झाकण्यासाठी मी आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहेत असा आरोप केला. पण तीन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील ते आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्धतीने मेस्मा लावण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
लसीकरण न करणाऱ्यांना
मदुराई जिल्ह्यात बंदी
कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन देशभरात पाय पसरवत आहे. त्याला तोंड देण्यासाठी सरकार आणि प्रशासन तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत, तामिळनाडूच्या मदुराई जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक ठिकाणांसाठी नोटीस जारी केली आहे, ज्यानुसार ज्यांनी कोविड-19 लसीकरण केलेले नाही, त्यांना 13 डिसेंबरपासून मदुराई जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाहीये.
अवकाळी पावसामुळे
शेतकरी अडचणीत
अवकाळी पावसामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या कांदा, हरभरा, गहू या रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. ढगाळ हवामाना मुळे देखील या नकदी पिकावर रोगराई पसरली आहे. शेतकरी अडचणीत सापडला. पिकांवर रोग पसरल्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागतेय.
दिएगो मॅराडोनाचे चोरी झालेले घड्याळ
भारतीय पोलिसांनी शोधून काढले
फुटबॉल क्षेत्रातील दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे दुबईत चोरी झालेले घड्याळ भारतीय पोलिसांनी शोधून काढले आहे. हे घड्याळ शनिवारी सकाळी आसामच्या शिवसागर जिल्ह्यातून जप्त करण्यात आले, त्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. मॅराडोना यांचे हुब्लोट (Hublot watch) हे मौल्यवान घड्याळ चोरीला गेले होते. आरोपी व्यक्ती दुबई येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती, जी मॅराडोना यांच्या वस्तूंची देखरेख करत होती.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने
कसोटीमध्ये ४०० बळी केले पूर्ण
ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी पूर्ण केले आहेत. ऑफस्पिनर लायनने २०२१-२२च्या अॅशेस मालिकेत ही कामगिरी केली. लायनने इंग्लंडच्या डेव्हिड मलानला आपला ४०० वा बळी बनवले. अशी कामगिरी करणारा लायन हा जगातील सातवा फिरकी गोलंदाज आहे. आतापर्यंत १७ गोलंदाजांनी ४०० कसोटी बळी घेतले आहेत. ४०० बळींचा प्रवास पूर्ण करणारा लायन हा तिसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.
SD social media
9850 60 3590