गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा देखील शिंदे गटातील नेते करताना दिसतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वेगळं चित्र पहायला मिळत आहे. दापोलीमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक आणि दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
योगेश कदमांचे कट्टर समर्थक
दापोली नगपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुसाळकर हे आमदार योगेश कदम यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र कुसाळकर यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केल्यानं हा शिंदे गटासोबतच योगेश कदम यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. कुसाळकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वी देखील ठाकरे गटाने जिल्ह्यात शिंदे गटाला धक्के दिले आहेत.