मुख्यमंत्रीपद गेलं, सरकार पडलं, आमदार-खासदार सोडून गेले, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही गेलं. मागच्या आठ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांना जवळपास सगळ्याच गोष्टी गमवाव्या लागल्या आहेत. चक्रव्यूहात अडकलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेवटची आशा आहे ती सुप्रीम कोर्टाची. मंगळवारपासून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी असे लागोपाठ तीन दिवस 16 आमदारांच्या अपात्रतेविषयीची सुनावणी होणार आहे.
याआधी मागच्या आठवड्यातही लागोपाठ तीन दिवस या मुद्द्यावर सुनावणी झाली होती, पण सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला. यानंतर आता पुन्हा एकदा मंगळवारपासून पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होईल.
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीष साळवे आणि महेश जेठमलानी युक्तीवाद करतील. निवडणूक आयोगाने शिवसेना आणि त्यांचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली, पण या नोटीसला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं. नरहरी झिरवळ यांच्याविरोधातच अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला असताना ते आमदारांना नोटीस कशी देऊ शकतात? असा प्रश्न शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला, यासाठी त्यांनी नबाम राबिया केसचा दाखला दिला.
तसंच या आमदारांनी पक्षांतर केलेलं नाही, त्यांच्यामध्ये पक्षांतर्गत वाद झाले, त्यामुळे या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याद्वारे कारवाई करण्यात येऊ नये, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून केला गेला. आता निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेंची असल्याचा निकाल दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात शिंदे गटाकडून याचा दाखला दिला जाण्याची शक्यता आहे.