पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामन्य बेजार झाला आहे. पण ही महागाई फक्त इंधन दरवाढीबाबतच मर्यादित नाही. खाद्य तेल, डाळ, भाज्या तसेच अन्य दररोजच्या वापरातील वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या 3 महिन्यात या वस्तू दुप्पटीने महागल्या आहेत. या महागाईमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावला. त्यामुळे जनता आधीच बेजार झाली आहे. त्यात वाढलेल्या महागाईमुळे जगायचं कसं, असा प्रश्न सर्वसामांन्यांना भेडसावत आहे.
दररोज महागणाऱ्या इंधनामुळे महागाई वाढत आहे. मुंबईत 3 महिन्यांपूर्वी डिझेलचे दर प्रती लीटर 88. रुपये 50 पैसे इतके होते. तर आता ताज्या आकडेवारीनुसार हे दर 94 रुपये 50 पैसे इतके आहेत. म्हणजेच 3 महिन्यांमध्ये डिझेलचे दर हे 6 रुपयांनी वाढले. याचा थेट परिणाम हा माल वाहतुकीवर झाला. अजूनही मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण वैयक्तिक पातळीवर टेम्पो आणि ट्रकचालकांनी मालवाहतुकीच्या दरात वाढ केली आहे.
डिझेल दरात गेल्या 6 महिन्यांमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. या तुलनेत मालवाहतुकीत 25 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सातत्याने जर असेल डिझेलचे दर वाढत राहिले, तर मालवाहतुकीत वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत संघटनेतर्फे देण्यात आले आहेत.
आता हे दर 26-28 रुपये झाले आहेत. तसेच भाज्यांच्या 50 किलोच्या गोणीच्या मालवाहतुकीसाठी टेम्पोचालक 15 रुपये आकारायचे. आता त्यामध्ये 7 रुपयांची वाढ होऊन ते दर 22 रुपये झाले आहेत. अशा प्रकारे नवी मुंबईहून येणाऱ्या भाजींच्या दरात प्रति किलो 12 रुपये इतकी वाढ झाली आहे. तसेच इतर वस्तूंच्या दरातही किलोनिहाय 8 रुपयांची वाढ झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये डाळ आणि खाद्यतेलाच्या मागणीत घट झाली. यानंतरही डाळ-खाद्य तेलाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. 3 महिन्यांआधी डाळींचे दर हे 100 रुपये किलो इतके होते. तर आत्ता हे दर 150 रुपयांवर पोहचले आहेत. भारत दरवर्षी 60 टक्के खाद्यतेल आयात करतो. पण या आयातीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी घट झाली आहे. 3 महिन्यांपूर्वी 110 ते 125 रुपयांमध्ये मिळणारे खाद्यतेल आता 180-200 रुपये पर्यंत पोहचले आहे. एका बाजूला तेलाच्या आयतीत घट झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला यावर 5 टक्के जीएसटी द्यावी लागते. त्यामुळे जीएसटी कमी करण्यात आली तर सर्वसामन्यांना काही दरात दिलासा मिळेल.