बीएचआर घोटाळा मागील काही दिवसापासून संपूर्ण राज्यात गाजत आहे. पुण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपींचे जामीन होत असतानाच दुसरीकडे आज पहाटे मात्र, जळगाव जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटकसत्र राबविले. यात भागवत भंगाळे (जळगाव) छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील जामनेर यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले. आसिफ मुन्ना तेली (भुसावळ, जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर) अशा अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आता सात जणांना अटक करण्यात आली असून यात जळगाव व जामनेरसह इतर ठिकाणच्या मातब्बरांचा समावेश आहे. आज पहाटे जळगावातील व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झालटे व जितेंद्र पाटील, भुसावळ येथील आसीफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार आणि संजय तोतला व अजून एकाला अटक केली आहे. पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, बीएचआर पतपेढीच्या गैरव्यवहारात २०१६च्या अखेरीस झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतील आर्थिक व्यवहाराची किनार देखील कारणीभूत असल्याची चर्चा होती. यातील कागदोपत्री पुरावे देखील असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमिवर, आज जळगावात दाखल झालेल्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विधानपरिषदेच्या निवडणुकीशी संबंधीत व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.