ठाकरे गटाला मशाल ! ; आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता

शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली. ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

ठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. मात्र, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ हा पक्षनावाचा पर्याय शिंदे गटानेही दिला होता. दोन्ही गटांकडून एकाच नावाचा आग्रह धरला गेल्याने हे पक्षनाव कोणत्याही गटाला न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आणि ठाकरे गटाच्या दुसऱ्या पर्यायाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे ठाकरे गट आता ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ या नावाने ओळखला जाईल.

ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘धगधगती मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नव्हते. ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने आणि या चिन्हावरही शिंदे गटाने हक्क सांगितल्याने हे चिन्हही रद्द झाले. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह खुल्या यादीतील नसले तरी, आता ते खुले करण्यात आले आहे. हे चिन्ह २००४ मध्ये ‘समता पक्षा’ला देण्यात आले होते. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाला वापरता येईल.  शिंदे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ तसेच, ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, ‘गदा’ या चिन्हालाही धार्मिक संदर्भ असल्याने आयोगाने हे चिन्ह नाकारले. धार्मिक संदर्भ असलेली चिन्हे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्हे म्हणून न देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी, दुपारी एक वाजेपर्यंत पक्ष व चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्यास सांगितले होते. मात्र, दोन्ही गटांकडून सादर झालेल्या नाव आणि चिन्हांमध्ये साधम्र्य असल्याचेही उघड झाले. त्यामुळे आयोगाकडून कोणता निर्णय घेतला जाईल, याकडे लक्ष लागले होते. अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केली होती. त्यावर, शनिवारी रात्री उशिरा केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे मूळ नाव व ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला.

ठाकरे गटाच्या वतीने पर्यायी पक्षनावे व चिन्हे जाहीर केली होती. मात्र, शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला कोणते पर्याय सुचवले गेले, याबाबत सोमवारी दिवसभर या गटाच्या वतीने अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नव्हते. मात्र, शिंदे गटाने सुचवलेल्या पक्षांच्या नावाचे व चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाच्या पर्यायांप्रमाणेच असल्याचे सांगितले जात होते. शिंदे गटाने पक्षनावांसाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना बाळासाहेबांची’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगाला सादर केल्याचे सांगण्यात येते. ‘आम्ही पक्षनाव तसेच चिन्हांचे पर्याय सादर केल्यानंतर लगेच ही बाब सार्वत्रिक केली जात असून शह-काटशहचा खेळ केला जात आहे’, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.