चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; तीन जण पोलिसांच्या ताब्यात
भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वक्तव्य केलं आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Pushpa 2 मध्ये होणार डबल धमाका! अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा हा सुपरस्टार
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा-द राईज’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत अनेक नवे रेकॉर्ड स्थापित केले आहेत. या चित्रपटाने लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावलं आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स आणि गाणी सतत लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची जोडी सुपरहिट ठरली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागून आहे. अल्लू अर्जुन 12 डिसेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण याच दरम्यान चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
मेकर्सनी आता ‘पुष्पा 2’ चित्रपटाची तयारी केली आहे. अल्लू अर्जुन 12 डिसेंबरपासून ‘पुष्पा 2’ ची शूटिंग सुरू करणार आहे. ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार हे ‘पुष्पा 2’ हा चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी या चित्रपटात मोठ्या कलाकारांची एंट्री होणार असल्याच्या बातम्या मीडियात येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकुमार या चित्रपटात सुपरस्टार राम चरण कॅमिओ करणार आहे. या बातमीनंतर चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मात्र, या वृत्ताची औपचारिक माहिती निर्माते किंवा चित्रपटाच्या टीमने दिलेली नाही.
गुजरात सरकारच्या शपथविधीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, शिंदे सोहळ्याला जाणार?
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय झाल्यानंतर आता सत्तास्थापनेला वेग आला आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे. या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
एनडीएचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीचं निमंत्रण मिळालं आहे. मातोश्रीऐवजी आता ठाण्यातून येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शपथविधीला बोलावण्यात आलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाबाबत गुजरात सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे, याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरे यांच्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुजरात सरकारकडून खास आमंत्रित करण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी माती परीक्षण कार्ड, तब्बल 22 कोटी लाभार्थ्यांना झालं वाटप
भारत सरकारने माती परीक्षण कार्डच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना राबवली आहे. दोन टप्प्यांत देशभरातील शेतकऱ्यांना 22 कोटींहून अधिक माती परीक्षण कार्ड देण्यात आली आहेत. माती परीक्षण व्यवस्थापन योजने अंतर्गत विविध प्रकारच्या माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याची शासनाची तरतूद आहे. आतापर्यंत 499 कायमस्वरूपी माती परीक्षण प्रयोगशाळा, 113 फिरत्या माती परीक्षण प्रयोगशाळा, 8811 लघु माती परीक्षण प्रयोगशाळा आणि 2395 ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.परिस्थिती बदलली आहे, हवामान बदलाचं आव्हानही समोर आहे आणि त्यातच माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू ठेवणं हे मोठं आव्हान आहे. आता रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता झपाट्याने कमी होत आहे, असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय.
‘मी तुम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास मदत करू शकतो’ WhatsApp वर चक्क धर्मांतराची ऑफर
उत्तर प्रदेशात वाराणसीमध्ये व्हॉट्सअॅपवरून धर्मांतरासाठी प्रयत्न केले जात असल्याचं उघडकीला आलं आहे. व्हॉट्सअॅपवरून अनेकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं जात आहे. इस्लामची संपूर्ण माहिती दिली जाते आणि त्यासोबतच इस्लाम धर्म स्वीकारण्याचं आवाहनही व्हॉट्सअॅपवरून करण्यात येत आहे. असे मेसेज व्हॉट्सअॅपद्वारे वाराणसीतल्या अनेक नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. परंतु ‘बीएचयू’मधल्या एका तरुण उद्योजकाने या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली.
हे प्रकरण सिगरा पोलीस स्टेशन परिसरातला रहिवासी असलेल्या मृत्युंजयशी संबंधित आहे. तो बनारस हिंदू विद्यापीठाच्या अटल इन्क्युबेशनचा तरुण उद्योजक आहे. मृत्युंजयच्या मोबाईलवर 8075290538 वरून एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. त्यामध्ये सुरुवातीला लिहिलं होतं, की ‘आमच्या चॅटमध्ये आपले स्वागत आहे, तुम्ही इस्लामबद्दल खुलेपणाने काहीही विचारू शकता. मी तुम्हाला इस्लाम धर्म स्वीकारण्यास मदत करू शकतो.’ यासोबतच मेसेज पाठवणाऱ्याने इस्लामचा इतिहास आणि उदय याविषयी माहिती पाठवली.
याच महिन्यात असणार आहे सर्वांत मोठी रात्र
आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीबद्दलच्या अनेक बाबी अनेकांना माहिती नसतात. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं, तर नक्कीच आपल्या ज्ञानात भर पडू शकते. शिवाय त्यातून अनेक आश्चर्यंही कळतील. पृथ्वीवरच्या अशाच काही रंजक गोष्टी जाणून घेऊ या.’टिव्ही 9’ने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी आहेत. त्यातल्या बऱ्याच गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. पृथ्वीवरची सर्वांत मोठी रात्र कधी असते, या बाबीचाही त्यात समावेश आहे. वर्षातली सर्वांत मोठी रात्र ही 22 डिसेंबरला असते. म्हणजेच तेव्हा दिवस सर्वांत लहान असतो. हा दिवस विंटर सॉल्स्टिस म्हणून ओळखला जातो. 21 डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. त्यानंतर पुन्हा दिवस मोठा होण्यास सुरुवात होते. पृथ्वीवरचा सर्वांत मोठा दिवस 21 जून हा असतो. या दिवशी सूर्याची किरणं पृथ्वीवर सर्वांत जास्त काळ पडतात. या दिवशी जवळपास 15 ते 16 तास सूर्यकिरणं पृथ्वीवर पडतात. त्यामुळे तो सर्वांत मोठा दिवस ठरतो.
‘मंदौस’ चक्रीवादळामुळे चेन्नईत वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
‘मंदौस’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाने तामिळनाडूची किनारपट्टी ओलांडली असून ते वायव्य दिशेने पुढे जात असल्याने या भागात ५५ ते ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहताना दिसून येत आहेच, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच संध्याकाळपर्यंत या वाऱ्यांची गती मंदावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
इशान किशनने बांगला टायगर्सची केली शिकार! भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी विजय
चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.
मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्याने भारतीय संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा बनला होता. नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिखर धवन केवळ तीन धावा करून माघारी परतल्यानंतर ईशान किशन व विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना अक्षरक्ष: गुडघे टेकण्यास भाग पाडले.
विराटने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सचिननंतर अशी कामगिरी करणारा दुसरा
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची बॅट आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही तळपली आहे. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक शतक केलं आहे. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकलंय. याच सामन्यात इशान किशनने द्विशतकी खेळी केलीय.विराटने 85 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने शतक झळकावलं. एकदिवसीय क्रिकेटमधलं त्याचं हे 44 वे शतक आहे. त्याने रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर 71 शतके आहेत. तर विराटने 536 डावात 72 शतके केली आहेत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकरनंतर विराटचा नंबर लागतो. सचिन तेंडुलकरने एकूण 100 शतके केली आहेत.
SD Social Media
9850 60 3590