राज्यात पावसाने दडी दीर्घकाळ दडी मारल्यामुळे सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मात्र, त्यामुळे पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती जिल्ह्यात खरीप हंगामातील 31 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे 1 लाख 84 हजार 278 हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत 57 हजार 557 क्षेत्रातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पाऊस नसल्याने या पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.