एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची
मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. पावसाळी अधिवेशनात एमपीएससीच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवली आहे.
भाजपाच्या १२ आमदारांचं
एका वर्षासाठी निलंबन
सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. हे निलंबन करण्यापूर्वी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आपली बाजू मांडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला.
सरकारकडे बहुमत, त्यामुळे
निलंबन प्रस्ताव मंजूर : फडणवीस
सभागृहात निलंबन प्रस्ताव मांडण्यापूर्वी तालिका अध्यक्षांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अध्यक्ष महोदय, आपण जी वस्तुस्थिती सांगितली, त्यात हे सांगितलं पाहिजे की, तिथे शिवसेनेचे आमदारही आले होते. शिवसेनेचे आमदार आणि भाजपाचे आमदार यांच्यात बाचाबाची झाली. मी स्वतः पूर्ण लोकांना बाहेर काढलं. हे खरं आहे की, आम्ही रागात होतो. बाचाबाची झाली. पण नंतर आपण गळाभेट घेतली. त्यानंतर आता असा प्रस्ताव येत असेल, तर… सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करून घ्याल. विरोधकांची संख्या कमी करत असतील, तर हे योग्य नाही,” असं मत फडणवीस यांनी मांडलं.
दारूची दुकाने पुन्हा उघडली,
चक्क फोडले फटाके
करोनामुळे अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आला होता. आता करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. लॉकडाउनमध्ये दारूची दुकाने सुद्धा बंद करण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाली होती. दरम्यान, तामिळनाडूच्या कोईंबतूरमध्ये दोन महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांनी आनंद साजरा करण्यासाठी गाण्यावर ठेका धरत चक्क फटाके आणि नारळ फोडले.
माजी राष्ट्रपती यांचे पुत्र अभिजित
मुखर्जी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अभिजित मुखर्जी यांनी २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. २०१९ मध्येही काँग्रेसने त्यांना या जागेवरुन तिकीट दिले पण त्यांचा पराभव झाला होता.
सभागृहात धमकी दिली
जात आहे : नाना पटोले
अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.
देशातली करोनाची दुसरी
लाट हळूहळू ओसरतेय
देशातली गेल्या २४ तासातली करोना रुग्णांची आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने नुकतीच जाहीर केली आहे. हे आकडे दिलासादायक असल्याने देशातली करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे असं म्हणायला हरकत नाही. देशातल्या करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तर घटतेच आहे. मात्र नवबाधितांची संख्याही कमी कमी होताना दिसत आहे.
अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांच्या कार्यकारी
अध्यक्षपदाचा आज शेवटचा दिवस
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा आज शेवटचा दिवस आहे. अॕमेझॉनचे कार्यकारी अधिकारी पद सोडल्यानंतर १५ दिवसांनी ते अंतराळात जाणार आहेत. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली होती. या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ दर्शन घडवण्यात येणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये ते असणार आहेत.
मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर
धर्म का बदलावा लागतो ? : कंगना
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. “एक काळ असा होता जेव्हा पंजाबमधील कुटुंबांमध्ये एका मुलाला हिंदू तर दुसऱ्या मुलाला शीख धर्माचे पालन करावे लागायचे. हिंदू आणि मुस्लीम आंतरधर्मिय लग्नातून जन्माला आलेली मुलं नेहमीच मुस्लिम का होतात. काळानुसार आपल्याला या गोष्टीही बदलायला हव्यात. जर एखाद्या कुटुंबामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि नास्तिक एकत्र राहू शकतात तर मग मुस्लिम का नाही राहू शकत? एखाद्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर आपल्याला धर्म का बदलावा लागतो?”, असे कंगना त्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
SD social media
9850 60 3590