आज दि.८ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी किती घेतले? आकडे आहेत डोळे विस्फारणारे

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडप्रकरणी आता नवा खुलासा समोर आला आहे. सिद्धूला मारण्यासाठी 1 कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक मारेकऱ्याला 50 लाख दिल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 29 मे दरम्यान मारेकऱ्यांकडे 10 लाख रुपयांच्या जवळपास पैसे होते, असेही तपासात उघड झाले आहे.पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कॅनडातील गँगस्टर गोल्डी ब्रार आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेले लॉरेन्स बिश्नोई यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

शिवसेनेतील बंडापुढे उद्धव ठाकरे नरमले? द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मोठं वक्तव्य

राज्यातील सत्तातरानंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवकही शिंदे गटात सहभागी होत आहेत. याशिवाय खासदारही बंडखोरीच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत.द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यायचा की नाही हे खासदारांसोबत बोलून ठरवेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचं हे विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झालं आहे. जपानी वृत्तसंस्था एनएचकेच्या हवाल्याने रॉयटर्सने आबे यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं म्हटलं आहे. सकाळी आबे हे एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजून ३३ मिनिटांनी म्हणजेच हल्ल्यानंतर दोन तासांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलीय.

नवाब मलिकांनंतर उस्मानाबादमध्ये ईडीची मोठी कारवाई; तब्बल 45 कोटींची मालमत्ता जप्त 

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर ED ने कारवाई केली आहे. उमरगा MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरी ब्रिव्हरेज कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत आहे. तर गेल्या 5-6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता-पूत्र संचालक असलेल्या फॅक्टरीची मालमत्ता व मशिनरी जप्त केली असल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली आहे. ईडीने त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे. उमरगा MIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे.

देशात येणाऱ्या चिनी वस्तू घटल्या, आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

देशात चिनी वस्तू न वापरण्यासंबंधी वारंवार आवाहन केलं जातं. मात्र, टेलिकॉम आणि ऊर्जा क्षेत्रातील काही गोष्टींसाठी चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून रहावं लागतं. या गोष्टीत आता मोठा बदल दिसून आला आहे.चीन देश मोबाईल फोनचा मोठा उत्पादक आहे. भारतातदेखील कित्येक चिनी मोबाईल कंपन्यांनी आपला जम बसवला आहे. मात्र पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, चीनमधून होणारी मोबाईल फोन्सची निर्यात 2021-22 वर्षात तब्बल 55 टक्क्यांनी कमी होऊन 626 कोटी डॉलर्स एवढी झाली आहे. 2020-21 साली ही निर्यात 1.4 अब्ज डॉलर्स एवढी होती. आयात झालेल्या उत्पादनांची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी काही उत्पादनांचे टेक्निकल रेग्युलेशन्स तयार करण्यात आले आहेत. यानुसार एखाद्या देशातून येणाऱ्या सब-स्टँडर्ड उत्पादनांची तपासणी करण्यात येते. यामध्ये चीनमधून येणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.

 ‘सगुण सावळा पांडुरंग’, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेची आषाढी एकादशीनिमित्त खास भेट

‘पाऊले चालती पंढरीची वाट’…या ओळींप्रमाणे सध्या प्रत्येक भक्ताला माऊलीच्या भेटीची ओढ लागली आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या पद्धतीने विठुरायाचं दर्शन घेत आहेत. कोणी वारीमध्ये सहभागी होत आहे, तर कोणी वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवत आहे. दरम्यान आता ‘इंडियन आयडॉल’  फेम गायिका सायली कांबळेने अनोख्या पद्धतीने विठुरायाचं स्मरण केलं आहे.दरम्यान आता सायली कांबळेने तिच्या चाहत्यांसाठी एक फारच आनंदाची बातमी शेअर केली आहे. सायलीने पहिल्यांदाच अभंग गायला आहे. गायिकेने याचा टीजर शेअर करत लिहलंय, ”नमस्कार. मी पहिल्यांदाच अभंग गाण्याचा प्रयत्न केला आहे. माझा खूप चांगला मित्र @pranavmusic94 याने हा अभंग संगीतबद्ध केला असून समृद्धी पांडे हिने लिहीला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उद्या ‘सगुण सावळा पांडुरंग’ हा प्रासादिक अभंग माझ्या युट्युब चॅनलवर प्रकाशित होणार आहे. तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडेल अशी मी आशा व्यक्त करते…”

भाजपची नवी खेळी; माजी शिवसैनिक उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत, सुरेश प्रभूंना उमेदवारी?

माजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू  हे भाजपचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये सुरेश प्रभूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सर्वसामान्यांतील मुख्यमंत्री; शिंदेंचा मोठा निर्णय, CM ताफ्याच्या प्रवासातील स्पेशल प्रोटोकॉल नाकारला!

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांतील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या अवघ्या काही दिवसात शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही – उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला खडसावलं

राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष केंद्रस्थानी आहे.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार गमावल्यानंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरे गट गमावण्याची शक्यता आहे.’शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल.’ असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी! 92 नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं, ओबीसी आरक्षणाचं काय?

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होईल. तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या निवडणुकादेखील ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय

 ‘स्वत: दहावी दोनदा नापास…’ मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या राऊंताना निलेश राणेंचं उत्तर

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांचा एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ला सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी खोचक टीका केली होती. राऊत यांच्या टीकेला भाजपा नेते निलेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. ‘स्वत: दहावी दोनदा नापास’ असे म्हणत राणे यांनी राऊत यांना उत्तर दिलं आहे. राणे यांच्या उत्तरामुळे कोकणातील दोन नेत्यांमधील हा वाद आणखी चिघळणार आहे.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; होम, पर्सनलसह कार लोनच्या व्याजदरात वाढ

सर्वसामान्य नागरिक महागाईने पुरते मेटाकुटीस आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना आता ईएमआयचा हप्ता वाढून लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. आरबीआयने नुकतीच रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर खासगी बँकांकडून सर्व प्रकारच्या कर्जावरच्या व्याजदरात वाढ झाल्याने ग्राहकांना अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. खासगी क्षेत्रातल्या एचडीएफसी बँकेने तर वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जांसाठीच्या एमसीएलआर दरांमध्ये 20 बेसिस पॉइंट्सने म्हणजेच 0.20 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे गृहकर्ज , वैयक्तिक कर्ज आणि कार कर्जाच्या व्याजदरात वाढ होणार आहे. याचाच अर्थ, ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. एचडीएफसी बँकेने 7 जुलै 2022 पासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. त्याबद्दलचं वृत्त ‘टीव्ही नाइन हिंदी’ने दिलं आहे.

दोन सामने जिंकू शकत नाही”, आत्मसन्मानासाठी जखमी राफेल नदालची विम्बल्डनमधून माघार

टेनिसपट्टू राफेल नदालने विम्बल्डनमधून माघार घेतली आहे. पोटातील स्नायूंच्या दुखापतीमुळे पुढचे दोन सामने जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्मसन्मानासाठी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे राफेल नदालने म्हटले आहे. राफेलच्या या निर्णयाने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला आपल्या कारकिर्दीतील पहिली ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.

ऐश्वर्या रायचं 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक

अभिनेत्री ऐश्वर्या रायला बाॅलिवूडमधील ब्यूटी क्वीन म्हणून ओळखलं जातं. अनेक वर्षांपासून ऐश्वर्या कोणत्याही चित्रपटांत झळकली नाही मात्र तरीही तिची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावर ती कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असलेली पहायला मिळते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच लाखो मनांवर अधिराज्य करणारी ऐश्वर्या राय लवकरच आपल्या अभिनयाची भुरळ घालण्यासाठी येत आहे. चार वर्षानंतर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर पदार्पण करत असून तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.ऐश्वर्या राय साऊथ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. साऊथच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट 1’या चित्रपटात ऐश्वर्या अभिनेत्री ‘राणी नंदिनी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील ऐश्वर्याचा पहिला लुक प्रदर्शित झाला असून तिच्या लुकनं चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या पहिल्या लुकमधील सौंदर्यानं सगळेच पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.