सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढत चालला आहे. फोटो, व्हिडिओ, ऑडिओ शेअर करण्यासाठी युझर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सना प्राधान्य देत आहेत. जगभरात रोज लाखो फोटो, व्हिडिओ या माध्यमातून शेअर केले जात आहेत. या प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढत असताना, दुसरीकडे हॅकर्स या माध्यमातून फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. सर्वसामान्यपणे व्हिडिओ पाहण्यासाठी यू-ट्यूबचा सर्वाधिक वापर केला जातो; पण आता यू-ट्यूबवर सर्चिंग करणं धोकादायक ठरू शकतं. कारण व्हॉट्सअॅप आणि गुगल प्ले स्टोअरवर मालवेअरच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर हॅकर्सनी यू-ट्यूबला आपलं लक्ष्य बनवलं आहे. यू-ट्यूबच्या माध्यमातून हॅकर्स युझरचे पासवर्ड, टेलिग्राम मेसेज आणि स्क्रीनशॉट चोरत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे तुम्ही यू-ट्यूबवर सर्चिंग करत असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
यू-ट्यूबवर तुम्ही सातत्यानं नवीन व्हिडिओ सर्च करत असाल तर आता पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण हॅकर्सनी फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. तुमच्याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हॅकर्सनी चोरी करणारं पेनीवाइज नावाचं एक नवीन मालवेअर तयार केलं असून, त्याचा प्रसार करण्यासाठी यू-ट्यूबचा वाहक म्हणून वापर केला जात आहे. सायबर रिसर्च लॅबमधल्या सायबर संशोधकांनी पेनीवाइज मालवेअर शोधून काढलं असून, त्यातून यू-ट्यूबवरचे 80 पेक्षा जास्त व्हिडिओ उघड केले आहे. या व्हिडिओ तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी सक्षम आहेत. मालवेअर पीडित व्यक्तीच्या डिव्हाइसमधून संवेदनशील ब्राउझर डाटा आणि क्रिप्टोकरन्सी वॉलेट चोरण्यावर लक्ष केंद्रित करतो.
यात विशेष बाब म्हणजे हा मालवेअर पीडित व्यक्तीचा देश ओळखण्याचा प्रयत्न करतो. जर पीडित व्यक्ती रशिया, युक्रेन, बेलारूस आणि कझाकस्तानची असेल तर तो सर्व ऑपरेशन्स पूर्णपणे थांबवतो. ही बाब शक्य आहे. कारण हॅकर्स या विशिष्ट देशांमध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींकडून होणाऱ्या तपासापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हा मालवेअर सिस्टीम डिटेल्सपासून ते लॉगिन क्रेडिन्शियलपर्यंत सर्व माहिती चोरण्यास सक्षम आहे. अगदी कुकीज, एन्क्रिप्शन की, मास्टर पासवर्ड, डिस्कॉर्ड टोकन आणि टेलिग्राम सेशनदेखील तो चोरू शकतो. याशिवाय, संभाव्य क्रिप्टोकरन्सी वॉलेट किंवा क्रिप्टोशी संबंधित ब्राउझर अॅड-ऑनसाठी डिव्हाइस स्कॅन करताना स्क्रीनशॉट घेण्यासही सक्षम आहे. हॅकर्सनी सर्व डाटा संकलित केल्यानंतर तो एका फाइलमध्ये कॉम्प्रेस केला जातो.
सायबर सुरक्षा संशोधकांना यू-ट्यूबवर अनेक व्हिडिओ आढळून आले आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करू शकतात. यापैकी बहुतेक व्हिडिओ बिटकॉइन मायनिंग सॉफ्टवेअर कसं कार्य करतं, हे स्पष्ट करतात. युझर्सना या व्हिडिओच्या डिटेल्समध्ये डाउनलोड करण्यासाठी एक लिंक मिळते. ही लिंक खूप धोकादायक आहे. ही फाइल पासवर्ड संरक्षण आणि व्हायरस टोटल लिंकसह येते. ही फाइल क्लीन आणि पुढे जाण्यासाठी सुरक्षित आहे, अशी पुष्टी देते. एखाद्या युझरनं ही फाइल डाउनलोड केली तर त्यातून सिस्टीममध्ये पेनीवाइज मालवेअर इंजेक्ट होतो.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, हा मालवेअर जवळपास प्रत्येक प्रकारचा डाटा चोरण्यास सक्षम आहे. पेनीवाइज मालवेअर 30 पेक्षा जास्त क्रोमआधारित ब्राउजर, पाच मोझिला आधारित ब्राउजर, तसंच ओपेरा आणि मायक्रोसॉफ्ट एज यांसह अनेक ब्राउझरसाठी पाथ मिळवू शकतो. त्यामुळे यू-ट्यूबवर व्हिडिओ सर्चिंग करताना युझर्सनी शंकास्पद व्हिडिओ पाहणं टाळवं आणि पुरेशी सावधगिरी बाळगावी.