आज दि.१ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

बॕडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं जिंकलं कास्यपदक

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. आज रविवारी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५  असा पाडाव केला. याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात आता सिंधूने भारताच्या झोळीत कांस्यपदक आणून ठेवले. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले.

मेरी कोम , सायनानंतर आता ‘सिल्व्हर गर्ल’ ची कहाणी मोठ्या पडद्यावर ; लवकरच येणार मिराबाईच्या जीवनावर चित्रपट

टोकयो ऑलिम्पिक 2021′ मध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूने सर्वचं भारतीयांचं मन जिंकलं आहे. तिच्यावर सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे. आत्ता अजून एक आनंदाची माहिती समोर आली आहे. मीराबाई चानूवर लवकरच एक चित्रपट बनवला जाणार आहे. हा चित्रपट मणिपुरी भाषेत बनवण्यात येणार आहे. यासंबंधी काल मीराबाईच्या राहत्या घरी इम्फाळच्या नोगपोक काकचिंग या गावी इम्फाळच्या सेऊती फिल्म प्रोडक्शनतर्फे एक करारावर हस्ताक्षर घेण्यात आले आहेत. याबद्दलची माहिती निर्माण कंपनीचे अध्यक्ष मनाओबी एम एमकडून जाहीर करण्यात आली आहे.

नागपूरच्या संघ कार्यालयासमोर भाजप,
काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

नागपुरमध्ये भाजपा व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले असून, त्यांच्यात वादावादी व धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरमधील संघ मुख्यालयाच्या परिसरात हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोर्चा रोखण्याचा भाजपा कार्यकर्त्यांकडून प्रयत्न झाल्याने, वादावादी व नंतर धक्काबुक्की झाली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर, हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याचेही दिसून आले.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या
वक्तव्याचा सगळ्यांनीच घेतला समाचार

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी केलेल्या शिवसना भवन फोडण्यासंदर्भातल्या वक्तव्यावरून शिवसनेकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सावंत, शिवसेना आमदार गुलाबराव पाटील, राजन साळवी अशा अनेक शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड यांच्या विधानाचा समाचार घेतल्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसाद लाड यांच्या विधानावरून परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. लाड यांचं विधान हा भाजपाच्या प्रवृत्तीचाच दाखला आहे, असं नाना पटोले म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

हम दो, हमारे दोनो की
सरकार : राहुल गांधी

जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. मैत्री दिनाचं औचित्य साधत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. मैत्री दिनाच्या शुभेच्छा “हम दो, हमारे दोनो की सरकार” अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.

काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष
भाजपामध्ये दाखल

देशात ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला. माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर सचिन पायलट हे देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण ती फक्त अफवाच ठरल्यानंतर आता काँग्रेसला दुसरा मोठा झटका बसला आहे. अवघ्या ५ दिवसांपूर्वीपर्यंत काँग्रेसचे मणिपूर प्रदेशाध्यक्ष असलेले गोविंददास कोंथऊजम यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

कंदाहारमधील विमानतळावर
तालिबानकडून रॉकेट हल्ला

अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदाहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. तीन रॉकेट डागण्यात आले. यात एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमानं रद्द करण्यात आली. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

जुलै महिन्यात ६ लाख २८१ कोटी
रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार

गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

झिका काय, टीका काय, मिका
काय…डेल्टा काय : छगन भुजबळ

छगन भुजबळ यांनी नाशिक इथं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना या झिका विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले, हेच तर काही कळत नाहीये. झिका काय, टीका काय, मिका काय…डेल्टा काय, प्लस काय मायनस काय? रोज नवे नवे विषाणू येतायत. एकापाठोपाठ एक येणारे हे विषाणू जगाला कुठे घेऊन जाणार आहेत? आणि त्याची कारणं काय, उपाय काय औषधोपचार काय..हे शोधता शोधताच दुसरा विषाणू येतोय आणि सगळं जग सारखं मास्क आणि लॉकडाउनखाली आहे.

दगडफेक करणाऱ्यांना सरकारी नोकरी,
पासपोर्ट मिळणार नाही

जम्मू काश्मीर प्रशासनाने एक आदेश जारी केला आहे. या आदेशामुळे देशविरोधी कृत्य आणि दगडफेक करणाऱ्यांना सरकारी नोकरी आणि पासपोर्ट मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. काश्मीरच्या गुन्हे अन्वेषन विभागाने हा आदेश दिला आहे.

गुगल मीटसाठी नवीन
स्वतंत्र वेब अॕप लॉन्च

गुगलने गुगल मीटसाठी नवीन स्वतंत्र वेब अॕप लॉन्च केले आहे. वेब अॕप, ज्याला पुरोगामी वेब अॕप्लिकेशन म्हणूनही ओळखले जाते, यामध्ये गुगल मीट अॕपची सर्व वैशिष्ट्ये आहेत, परंतु ती पूर्णपणे वेबसाठी आहे. Google Meet वर मीटिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला यापुढे URL टाईप करण्याची किंवा Gmail वर जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मॅकबुकवर अॕप डाउनलोड आणि वापर करु शकता. गूगलने या वैशिष्ट्याची घोषणा केली तेव्हा झूमने आधीच हे अॕप आणले होते.

पुणे जिल्ह्यात आढळला
झिका विषाणूचा पहिला रुग्ण

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र असताना पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मोठं नवं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

तर एकट्या मराठवाड्यात
दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा

कोरोनाच्या दोन लाटांनीच सगळ्यांना नको नको करुन सोडलं. आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि ही लाट पहिल्या दोन लाटांपेक्षा अधिक डेंजर असेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कोरोनाची तिसरी लाट इतकी डेंजर असेल की एकट्या मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल, अशी शक्यता औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वर्तवली आहे.

46 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे
प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता संसर्गाची नवीन प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. देशातील 46 जिल्ह्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने संबंधित राज्यांना जिल्ह्यांमध्ये कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. निर्बंध घालण्याचा सल्लाही दिला आहे. केंद्राने 46 जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सांगितले आहे.

भारताच्या महिला हॉकी संघाचा
क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख असणाऱ्या हॉकी या खेळामध्ये सध्या देशाचा संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. टोकियो येथे सुरु असणाऱ्या ऑलिम्पक स्पर्धेमध्ये खेळवण्यात आलेल्या हॉकी सामन्यांत भारताच्या महिला हॉकी संघानं बाजी मारत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.