विधिमंडळ सदस्य यांच्यासाठी, “समर्पण ध्यानयोग” या एक दिवसीय शिबीराचे आयोजन उद्या मंगळवार, दिनांक ३ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते १.३० या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन’, ‘वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र’ व ‘महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी व कर्मचारी कल्याण केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
शिवकृपानंद स्वामी यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि ध्यान प्रात्यक्षिक असा कार्यक्रम महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उप सभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
वाढते मानसिक ताणतणाव आणि कोविड-१९ च्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती, यावर मात करण्यासाठी ध्यानसाधना पूरक ठरत आहे. त्यादृष्टीने सर्वांना प्रेरक आणि पथदर्शी ठरेल असा हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यास सर्व सन्माननीय सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी केले आहे. कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांच्या अधीन हा कार्यक्रम होईल.
परमपूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींचा परिचय
स्वामीजींनी अनेक वर्षे हिमालयात वास्तव्य आणि भ्रमण करून, कठोर साधना करून हा समर्पण ध्यानयोग संस्कार ग्रहण केला. प्रथम हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक राज्यांत, आदिवासी भागांत हा संस्कार प्रदान करण्याचे कार्य करून स्वामीजी समाजाच्या प्रमुख प्रवाहात आले व हळूहळू, गेल्या २५ वर्षांत हा संस्कार जगातील अनेक राष्ट्रांमध्ये पोहोचला आहे.
ध्यानयोगाची शिबिरे, सामूहिक महाध्याने, ग्रंथलेखन यांद्वारे स्वामीजींनी समाजामध्ये अंतर्मुख होण्याची, सामूहिक साधनेतून सशक्त होण्याची आवड निर्माण केली. आज विश्वभरात शेकडो ध्यानकेंद्रे तसेच अनेक आश्रम कार्यरत आहेत आणि लाखो लोक ध्यानाचा आनंद घेत आहेत.
समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक वर्षे अव्याहतपणे त्यांचे कार्य सुरूच आहे. सुरक्षाकर्मींसाठी, मुख्यत्वेकरून पोलीस दलासाठी, सैन्यदलासाठी, तुरुंगातील कैद्यांसाठी, शिक्षकांसाठी, डॉक्टरांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, देशातील युवकांसाठी, लहान मुलांसाठी स्वामीजींकडून अनेक ठिकाणी ध्यानयोगाची शिबिरे मार्गदर्शनपर कार्यक्रम केले गेले.
विशेषतः कोविडच्या कठीण काळातही भय, असुरक्षितता यांनी प्रभावित न होणारी एक मोठी जनशक्ती तयार झाली आहे.