कारखाने ऊस नेत नसल्याने फड
पेटवून शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील हिंगणगाव इथल्या नामदेव जाधव या शेतकऱ्याने कारखाने ऊस नेत नसल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं. नैराश्यातून नामदेवने आपला ऊस स्वतः पेटवून दिला. त्यानंतर ऊस पेटवल्याचं त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करुन सांगितलं. नातेवाईकांना त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण नामदेव पूर्णपणे हताश झाला होता, त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नामदेवच्या आत्महत्येने संपूर्ण गाव हळहळलं. ऊसाचा प्रश्न गंभीर होत असताना शासन याकडे लक्ष देत नाहीए, शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरत नसल्याचं गावातील इतर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक
आम आदमी पक्ष लढवणार
लवकरच राज्यातील मुदत संपलेल्या महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यापैकी राज्यातील आणि देशातील महत्त्वाची समजली जाणारी महापालिका म्हणजे मुंबई महापालिका दिल्ली आणि पंजाब विधानसभेमध्ये आपला डंका वाजवल्यानंतर आता आम आदमी पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक लढण्याचे संकेत दिल्यानंतर आपने मोठ्या घोषणा केल्या आहेत. बीएमसीत आलो तर आम्ही मुंबईकरांना वीज मोफत देणार, पाणी मोफत देणार, महापालिका निवडणुकीकरता कुणाशीही युती करणार नाही. १० वर्षे काम करतोय, ४० हजार कार्यकर्ते आहेत. उद्यासुद्धा निवडणूका लढवायला तयार आहोत, त्याचबरोबर सर्व जागांवर निवडणूक लढवायला तयार असल्याचे आप ने म्हटले आहे.
राजेश टोपे यांनी दहा पंधरा लाखांत
उत्तर पत्रिका विकल्या : सदाभाऊ खोत
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल आरोग्य भरतीची ग्रुप ड वर्गाची परीक्षा परत घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर आता आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया केली. आरोग्य भरतीच्या परीक्षेवेळी राजेश टोपे यांनी दहा पंधरा लाखांत उत्तर पत्रिका विकल्या असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. ते जालन्यामध्ये बोलत होते. राज्यात आरोग्य परीक्षेच्या घोटाळ्यावरुन गदारोळ झाला होता. आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता.
श्रीलंकेतून राजपक्षे
परिवार पळून गेला
श्रीलंकेवर आर्थिक संकट कोसळलं असतांना आता एक नवीन चर्चा रंगू लागली आहे. श्रीलंकेला आणीबाणी सारख्या मोठ्या संकटात सोडून राजपाक्षे परिवार देश सोडून पळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे. महिंदा राजपाक्षे यांचा मुलगा योशिता राजपक्षे याला त्याच्या पत्नीसह शेवटच्या वेळी सिंगापूर विमानतळावर बघण्यात आले आहे. महिंदा राजपक्षे यांच्या सरकारमध्ये योशिता हा प्राईम मिनीस्टर चिफ ऑफ स्टाफ या दुसऱ्या सर्वात महत्वाच्या पदावर कार्यरत होता. याआधी योशिताने श्रीलंकेच्या नेव्ही मध्ये लेफ्टिनेंट कमांडर म्हणून काम केले आहे.
उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा
नागपूरमध्ये दहावर पोहोचला
हवामान विभागानं पश्चिम विदर्भात गुरूवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे अकोला, वाशिम, बुलडाणा आणि अमरावती या जिल्ह्यात उष्णेतेचा तडाखा बघायला मिळत आहे. नागपूर आणि पूर्व विदर्भात उन्हामुळं आणि उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहे. यादरम्यान नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालकाचा रिक्षामध्येच मृतदेह आढळला आहे. सदर रिक्षाचालकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत रिक्षाचालकाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे उघडकीस आलं आहे, सदर माहिती पोलिसांनी दिली आहे. नागपूरच्या उष्माघाताने मृत्यू होण्याचा आकडा दहावर पोहोचला आहे. मे महिन्यात नागपूरसह विदर्भात उन्हाच्या तडाखा असाच कायम राहणार आहे.
बिल गेट्स यांना
करोनाची लागण
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांना करोनाची लागण झाली आहे. करोना पॉझिटिव्ह असले तरी सौम्य लक्षणे आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. आयसोलेट असून बरा होत नाही तोपर्यंत एकाकी राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बिल गेट्स म्हणाले की, “मी भाग्यवान आहे की मला लसीकरण करण्यात आले आहे आणि मी बूस्टर देखील घेतला आहे. वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे.”
राज ठाकरे यांना पत्राद्वारे
ठार करण्याची धमकी
मनसेचे बाळासाहेब नांदगावकर आणि राज ठाकरे यांना एका पत्राद्वारे ठार करण्याची धमकी देण्यात आलेली आहे. या पत्रामध्ये अजानबाबत जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु. तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू,” असं पत्रात लिहिलं असल्याची माहिती नांदगावकरांनी यावेळी दिली. हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
सोन्या-चांदीच्या
दरात घसरण
लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 24-कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 228 रुपयांनी घसरून 50,358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, जी तीन महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. त्याचवेळी चांदीचा भावही 280 रुपयांनी घसरून 60,338 रुपये प्रति किलोवर बंद झाला. मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळे इतके होते. चांदीचा दर 61,900 रुपये प्रति किलो इतका होता.
शिष्यवृत्ती योजनेचे
४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित असल्याने पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यास विलंब होत असल्याने महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचा आदेश समाज कल्याण विभागाने दिला आहे.
BMCची मोठी कारवाई! मुंबईच्या गोवंडी परिसरात 200 झोपड्या जमीनदोस्त
मुंबई महापालिकेने गोवंडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. महापालिकेने गोवंडी परिसरातील तब्बल 215 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत. अनधिकृत बांधकामाच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचं प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती जारी करण्यात आली आहे. संबंधित कारवाई करण्याआधी परिसरातील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधातील कारवाईला स्थगिती दिली नाही. त्यामुळे संबंधित कारवाई करण्यात आली.
‘अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी’ अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद या समाज कार्यत देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच अलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर टिका होत आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केले आहे. सध्या दीपाली सय्यद यांचे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही…असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लावला आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या 17 वर्षाच्या मुलाला हार्ट अॕटेक; परीक्षा केंद्रावरच कोसळला
बारावीची परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रावर आल्यानंतर परीक्षेसाठी आत सोडलं जात असताना पोलिसांच्या तपासणीतून जात असताना तब्येत बिघडली. त्याला परीक्षा केंद्राबाहेर अचानक छातीत दुखू लागलं. याविषयी त्याने एका पोलीस अधिकाऱ्याला आपली अडचण सांगितली.
हा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचला होता आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यानुसार केलेल्या तपास प्रक्रियेतून जात होता. तेव्हा त्याने छातीत दुखत असल्याबद्दल एका पोलिस अधिकाऱ्याला सांगितलं. या अधिकाऱ्याने त्याला जवळच बसवून घेतलं. मात्र, त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला. याविषयी त्याने पोलीस अधिकाऱ्याला सांगितलं असता त्या अधिकाऱ्यानं रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका काही अंतरावर असल्याने आणि सतीशला तातडीने उपचाराची गरज असल्यानं अधिकाऱ्यांनी त्यांला त्यांच्या वाहनातून रुग्णालयात नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
SD social media
9850 60 3590