सर्वच गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तू बनली आहे. जे मोबाईल युजर्स प्रीपेड प्लॅन वापरतात त्यांना दर महिन्याला डेटा, कॉलिंगसाठी रिचार्ज करावं लागतं. यासाठी युजर्स त्यांच्या गरजेनुसार खर्च करतात. गेल्या काही महिन्यांत सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे मोबाईलचा वापरदेखील महागला आहे. त्यातच कंपन्यांनी सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या प्लॅनच्या दरांत वाढ केली आहे. एकूणच मोबाईलमुळे खिशावरचा ताण वाढलेला असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. युजर्स आता केवळ 19 रुपये प्रतिमहिना रिचार्ज करून आपला मोबाईल क्रमांक अॅक्टिव्ह ठेवू शकतात. `बीएसएनएल`ने खास आपल्या ग्राहकांसाठी हा प्लॅन लॉंच केला आहे.
एका ठराविक कालावधीपर्यंत रिचार्ज न केल्यास मोबाईल सेवा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी युजर्स दरमहा एका ठराविक रकमेचं रिचार्ज करतात. परंतु, कंपन्यांनी सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या प्लॅनचे दर वाढवले आहेत. `बीएसएनएल`ने मात्र 19 रुपये प्रतिमहिना असा प्लॅन लॉंच केला आहे. 19 रुपयांचं रिचार्ज करून तुम्ही महिनाभर सिम अॅक्टिव्ह ठेवू शकता. जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचं सिम तुम्ही वापरत असाल, तर सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीचा सर्वांत स्वस्त प्लॅन 50 रुपयांपासून सुरू होतो, यासाठी युजर्सना कमाल 120 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो.
बीएसएनएल`च्या सिम अॅक्टिव्ह प्लॅनबाबत `91mobiles`ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. बीएसएनएल युजर्सकडे कोणताही डेटा प्लॅन किंवा बॅलन्स शिल्लक नसेल आणि युजर्सने 19 रुपयांचं रिचार्ज केलं तरी त्यांचा मोबाईल क्रमांक अॅक्टिव्हेट राहील. यामुळे त्यांना सर्व सेवा आणि इनकमिंग कॉल सुविधाही मिळत राहतील. या प्लॅनचं गणित मांडायचं झालं तर, या प्लॅनसाठी तुम्हाला वर्षाला 19*12 = 228 रुपये खर्च करावा लागेल. याचाच अर्थ 228 रुपयांत तुमचं `बीएसएनएल`चं सिम अॅक्टिव्ह राहील. हा प्लॅन बीएसएनएलच्या वेबसाईटवर व्हॉईस व्हाउचर प्लॅनमध्ये समाविष्ट केला गेला आहे.
बीएसएनएलव्यतिरिक्त अन्य टेलिकॉम कंपन्यांचे सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठीचे प्लॅन 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटीसह आहेत. मात्र बीएसएनएलचा प्लॅन 3G कनेक्टिव्हिटी ऑफर करतो. एका रिपोर्टनुसार, बीएसएनएलचं 4G नेटवर्क 15 ऑगस्ट 22 रोजी भारतात लॉंच केलं जाणार आहे. परंतु, तुम्हाला केवळ मोबाईल क्रमांक अॅक्टिव्ह ठेवायचा असेल, तर 19 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वोत्तम आहे. बीएसएनएलच्या 19 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना अनेक फायदे मिळतात. बीएसएनएलच्या या प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. कंपनीनं या प्लॅनचं नाव VoiceRateCutter_19 ठेवलं आहे. 19 रुपयांचं रिचार्ज केल्यानंतर ऑन-नेट आणि ऑफ-नेट कॉलचा दर 20 पैसे प्रतिमिनिट होईल. त्यामुळे बीएसएनएलचा हा सर्वांत स्वस्त प्लॅन युजर्सला फायदेशीर ठरू शकतो.