जायफळचा रक्तरंजित इतिहास, युद्धात अनेक शेतकरी मारले गेले

जायफळ मसाल्यांच्या श्रेणीत गणलं जातं. परंतु, ते बहुपयोगी आहे. जायफळ शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारं उष्ण स्वरूपाचं औषध आहे. विशेष म्हणजे जायफळाचा वापर पूजा-विधीतही मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसंच तंत्र-मंत्रातही ते महत्त्वाचं मानलं जातं. जायफळ हा जगातला असा एक मसाल्याचा पदार्थ आहे, ज्यासाठी रक्तरंजित युद्ध झालं होतं.

एकाच झाडापासून मिळतं जायफळ आणि जायपत्री

जगातल्या इतर मसाल्याच्या पदार्थांप्रमाणे, जायफळ हे हजारो वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. एकेकाळी सर्वांत मौल्यवान मसाला पदार्थांपैकी जायफळ मानलं जात असे. जायफळाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे यापासून दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात. त्यापैकी एक म्हणजे गुठळी स्वरुपात असते ते जायफळ आणि दुसरे म्हणजे त्यावरची एका जाळीदार साल म्हणजे जायपत्री होय. हे दोन्ही पदार्थ खूप गुणकारी मानले जातात. तसंच त्यांचा सुगंध मनमोहक असतो. जुन्या काळी यापासून परफ्युम बनवलं जात होतं. विशेष म्हणजे आज गोड आणि मसालेदार अशा दोन्ही पदार्थांमध्ये जायफळाचा वापर होतो.

इंडो-बर्मा मानले जाते जायफळाचे उगमस्थान

वस्तू जितकी जुनी तितकी तिच्या उत्पत्तीबाबत संभ्रमाची स्थिती असते, हे सर्वज्ञात आहे. परंतु, जायफळ हा मसाल्याचा पदार्थ हजारो वर्षं जुना आहे, याबाबत पुष्टी झाली आहे. जायफळाच्या उत्पत्तीच्या नेमक्या ठिकाणीविषयी अजूनही अंदाजच व्यक्त केला जातो. ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या वनस्पतीशास्त्र आणि वनस्पती पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापिका सुषमा नैथानी यांनी त्यांच्या `अन्न कहाँ से आता है` या हिंदी पुस्तकात जायफळाच्या उत्पत्ती केंद्राविषयी माहिती देताना जुन्या काळी जायफळाचं उत्पादन प्रामुख्यानं इंडो-बर्मा (Indo-Burma) उपखंडात होत असे, असं सांगितलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं कंबोडिया, लाओ पीडीआर, म्यानमान, थायलंड, व्हिएतनाममधला भूभाग आणि दक्षिण चीनमधला काही भाग समाविष्ट आहे. तसंच हे मसाला पीक इंडोनेशियाच्या मोलुकास बेट ज्याला बांदादेखील म्हणतात, तिथे सर्वप्रथम आढळलं असं संशोधनातून सूचित होतं.

दोन हजार वर्षांपासून होतो वापर

सुमारे 2000 वर्षांपासून जगभरात जायफळाचा वापर होतो, असं सांगितलं जातं. पहिल्या शतकात रोमन साम्राज्यात जन्मलेले लेखक आणि वनस्पती शास्त्रज्ञ प्लिनी द एल्डर यांनी जायफळाविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या नॅचरल हिस्ट्री या पुस्तकातल्या वनस्पतीशास्त्र प्रकरणात या झाडाविषयी माहिती देताना त्यांनी म्हटलं आहे, की यात दोन वेगवेगळ्या चवीची काष्ठफळं (जायफळ आणि जायपत्री) आहेत. पण मध्ययुगीन काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. आता भारताव्यतिरिक्त मलेशिया, पापुआ न्यू गिनी, श्रीलंका, कॅरेबियन बेटं, अमेरिका, जपान या देशांमध्ये जायफळाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो.

जायफळासाठी झाली होती रक्तरंजित लढाई

जायफळाच्या शेतीवर ताबा मिळवण्यासाठी किंवा स्वामित्वासाठी त्याचबरोबर याच्या व्यापारातून मोठा पैसा मिळत असल्याने 16 व्या शतकात एक मोठं युद्धदेखील झालं होतं. इंडोनेशियातल्या बांदा बेटावर जायफळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, हे समजल्यावर पोर्तुगीजांनी तेथील स्थानिक लोकांना ठार मारलं आणि संपूर्ण जायफळ ताब्यात घेऊन ते इतर देशांमध्ये विकण्यास सुरुवात केली. ही गोष्ट जेव्हा डच लोकांना कळाली तेव्हा त्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करून हे बेट आपल्या ताब्यात घेतलं. पुढे, डच सैन्य आणि व्यापाऱ्यांना ठार मारल्यानंतर अखेरीस ब्रिटिशांनी या बेटावर आपला झेंडा फडकवला. जायफळासाठी हा परिसर सुमारे 150 वर्षं रणभूमी बनला होता.

जायफळाचे गुणधर्म आहेत रहस्यमय

जायफळात नेमके कोणते गुणधर्म आहेत, ही बाब अद्याप रहस्यमय आहे. भारतात मसाल्याशिवाय पूजा-विधी आणि होमहवनात जायफळाला महत्त्वाचं स्थान आहे. जायफळ शिवलिंगावर अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं. काही देशांमध्ये जायफळाचा वापर तंत्र विद्या आणि घरगुती उपायांसाठी केला जातो. जायफळ हा उष्ण गुणधर्म असलेला मसाल्याचा पदार्थ आहे. जायफळाचं अतिसेवन केल्यास भ्रम निर्माण होतो. प्राचीनकाळी मादक पेय तयार करण्यासाठी जायफळाचा वापर होत असे. सम्राट हेन्री सहावा याने त्याच्या राज्याभिषेकापूर्वी रोमच्या रस्त्यांवर जायफळ पसरवून सुगंधी वातावरण तयार केलं होतं. मध्ययुगात ब्रिटनमध्ये प्लेग हा आजार पसरला होता, तेव्हा या आजारावर उपचारांसाठी जायफळाचा वापर केला गेला. आज गोड आणि तिखट अशा दोन्ही पदार्थांची चव वाढवण्यासाठी जायफळाचा वापर केला जातो.

झोपेच्या समस्येवर सर्वोत्तम उपाय

जायफळात प्रतिजैवक, अ‍ॅंटीऑक्सिडंट आणि अ‍ॅंटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. याव्यतिरिक्त जायफळात अनेक पोषक तत्त्वं आहेत. वैद्याचार्य आणि आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लहान बाळाला जायफळाच्या तेलानं मसाज केल्यास ते निरोगी राहतं आणि त्याची हाडंही मजबूत होतात. जायफळामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. एक कप गरम दुधात अर्धा चमचा मध, वेलची पावडर आणि दोन चिमूट जायफळ पावडर टाकून प्यायल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. ज्या लोकांना अनिद्रेचा त्रास आहे, त्यांनी रात्री झोपेपूर्वी थोडीशी जायफळ पावडर खाल्ल्यास चांगली झोप येऊ शकते. जायफळ ब्लड शुगर पातळी नियंत्रणात ठेवतं. जायफळातल्या काही घटकांमुळे जुनी सूज आणि संधिवात या समस्या दूर होतात.

जायफळ आहे उष्ण

त्वचा आणि सांधेदुखीशी संबंधित आयुर्वेदिक औषधांमध्ये जायफळाचा वापर होतो. परंतु, जायफळाचं अतिप्रमाणात सेवन जोखमीचं ठरू शकतं. कारण जायफळ हे उष्ण असतं. त्यामुळे जायफळाचं अतिप्रमाणात सेवन केल्यास डोळ्यांची आग होणं, डोकेदुखी, चक्कर येणं, त्वचेवर लाल चट्टे उठणं, तोंडाला कोरड पडणं आदी समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास आहे, त्यांनी जायफळाचं सेवन टाळावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.