सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांनी कोविड-19 च्या बूस्टर डोसची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. SII सीईओ आदर पूनावाला म्हणतात की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने खासगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत ६०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. SII ने कोविशील्ड लसीची किंमत ६०० रुपये निश्चित केली होती, तर भारत बायोटेच्या लसीची किंमत १२०० रुपये होती.
आदर पूनावाला यांनी याबाबत एक ट्विट केले आहे, ”आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर, SII ने खासगी रुग्णालयांसाठी कोविशील्ड लसीची किंमत प्रति डोस ६०० रुपयांवरून २२५ रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना प्रतिबंधात्मक डोस देण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे आम्ही सर्वजण पुन्हा एकदा कौतुक करतो.”
याचबरोबर, भारत बायोटेकने देखील कोव्हॅक्सीन या लसीच्या बूस्टर डोसच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक सुचित्रा एला यांनी सांगितले की, ”आम्ही खासगी रुग्णालयांसाठी कोवॅक्सिनची किंमत १२०० रुपयांवरून २२५ रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
आता १८ वर्षांवरील सर्वांना करोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांना बूस्टर डोस मिळेल. खासगी केंद्रांवर हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.