संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुतेरेस यांनी भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेच्या ‘फोर्स कमांडर’पदी नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती भारतीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल शैलेश तिनईकर यांच्या जागी करण्यात आली आहे.
२०१९ मध्ये तिनईकर यांना ‘फोर्स कमांडर’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तिनईकर यांचे अथक समर्पण, अमूल्य सेवा आणि प्रभावी नेतृत्वाबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस त्यांचे आभारी आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यम यांनी ३६ वर्षे भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. २०१५ ते २०१६ या काळात त्यांनी ‘इन्फंट्री डिव्हिजन’चे डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग आणि २०१३ ते २०१४ या काळात ‘माउंटन ब्रिगेड’चे ‘कमांडर’ म्हणूनही जबाबदारी सांभाळली. २००८ ते २०१२ दरम्यान त्यांनी व्हिएतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये भारताचे संरक्षण प्रभारी म्हणून आणि २००० मध्ये सिएरा लिओनमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेत अधिकारी म्हणून काम केले. अगदी अलीकडे, त्यांनी मध्य भारतात लष्करी क्षेत्राचे ‘जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले. याआधी, त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (लष्कर) एकात्मिक मुख्यालयात २०१९ ते २०२१ पर्यंत अतिरिक्त महासंचालक आणि २०१८ ते २०१९ पर्यंत ‘स्ट्राइक इन्फंट्री डिव्हिजन’मध्ये ‘डेप्युटी जनरल ऑफिसर कमांडिंग’ म्हणून काम केले.
संयुक्त राष्ट्र मोहिमेत भारताचे मोठे योगदान
भारत हा संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांत सर्वात मोठे योगदान देणारा देश आहे. दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मोहिमेत नोव्हेंबर २०२१ पर्यंत १७ हजार ९८२ सैनिक होते. या मोहिमेत भारताचे दोन हजार ३८५ शांती सैनिक असून, असे योगदान देणारा भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील बहुसंख्य शांतीसैनिक रवांडाचे आहेत. भारताचे ३० पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी आहेत.