रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या काही महिन्यांत वधारलेल्या खाद्यतेलाच्या किमती आता आणखी कमी होण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलबिया आणि धान्याच्या किमती वाढल्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाचे भावही भडकले होते; मात्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या महिन्यात कंपन्यांनी तेलाचे दर 10 ते 15 रुपयांनी कमी केले होते. हे दर आणखी कमी करण्याची गरज असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यासाठी काल (6 जुलै) खाद्यतेल कंपन्यांसोबत एक बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये खाद्यतेलाचे दर कमी करण्याबाबत सरकारनं कंपन्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता खाद्यतेलाच्या किमती आणखी 12 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेल सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होण्यासाठी सरकार काही उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपन्यांनी गेल्या महिन्यात खाद्यतेलाच्या किमती कमी केल्या होत्या; मात्र यात अजूनही 10 ते 15 टक्क्यांची कपात होऊ शकते असं सरकारचं म्हणणं आहे. त्या संदर्भात काल (6 जुलै) खाद्यतेल कंपन्यांसोबत सरकारची एक बैठक पार पडली. यात खाद्यतेलाच्या किमतीत कपात करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात तेलाचे दर कमी करण्याबाबत सांगितलं आहे, असं वृत्त टिव्ही नाईन हिंदिने दिलं आहे.
या बैठकीत कंपन्यांनी खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी तयार असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळेल. भारतात एकूण गरजेच्या निम्म्या तेलाची आयात इतर देशांमधून केली जाते. गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढल्या होत्या. त्यामुळे देशांतर्गत किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव वधारले. गेल्या काही महिन्यांत सरकारनेही काही उपाय केले. तसंच आता आंतरराष्ट्रीय बाजारातही सुधारणा होते आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत; मात्र घाऊक दराच्या तुलनेत किरकोळ दरांत घट झाली नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.