भारताची महान ऍथलीट पीटी उषा यांची राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटी उषा यांच्यासह फिल्म कंपोजर आणि संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
‘पीटी उषा यांना खेळातल्या त्यांच्या कामगिरीमुळे ओळखलं जातं, पण मागच्या काही वर्षांमध्ये नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन,’ असं ट्वीट पीटी उषा यांनी केलं आहे.
‘इलैयाराजा यांनी पिढ्यान पिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केलं. विनम्र पार्श्वभूमीतून आलेल्या इलैयाराजा यांनी खूप काही मिवलं आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे मला आनंद झाला आहे,’ असं दुसरं ट्वीट पंतप्रधानांनी केलं.
‘वीरेंद्र हेगडे यांनी सामाजिक सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य केलं आहे. धर्मस्थळ मंदिरामध्ये मला प्रार्थना करण्याची संधी मिळाली. तसंच त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेली भरीव कामगिरीही मी बघितली. संसदेची कार्यवाहीदेखील ते समृद्ध करतील,’ असं पंतप्रधान म्हणाले.
याशिवाय मोदींनी विजयेंद्र प्रसाद गारू यांचंही कौतुक केलं आहे. विजयेंद्र प्रसाद हे अनेक दशकांपासून रचनात्मक जगात काम करत आहेत. त्यांच्या रचना भारताची गौरवशाली संस्कृती दाखवतात, ज्याने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं मोदी म्हणाले.