जन्म. ४ जून १९५९
नीना गुप्ता यांचे नाव घेतले की नजरेच्या नजाकतींनी भारलेला सहज अभिनय आणि त्यांचा बोलका चेहरा डोळ्यासमोर येतो. बोल्ड अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांची ओळख होती.
नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन, खलनायक, जाने भी दो यारों, कमजोर कडी आणि गांधी अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. आयुष्यमानच्या शुभ मंगल सावधान या चित्रपटात त्यांनी आयुष्यमानच्या आईची भूमिका साकारली होती. बधाई हो या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूड मध्ये पुनरागमन केले. बधाई हो या चित्रपटातील नीना गुप्ता यांची भूमिका रसिकांना खूपच भावली. २०१९ मध्ये आलेल्या बधाई हो सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१९ मध्ये गोल्डन ज्युरी फिल्म फेस्टिव्हल मध्ये नीना गुप्ता यांना ज्युरीद्वारे देण्यात येणारा विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला होता.अनेक हिंदी चित्रपटांसोबत इंग्रजी आणि भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी हिंदी टेलिव्हिजन विश्वातील एक अग्रगण्य लेखक-दिग्दर्शक श्याम महेश्वरी हा ‘चरणदास चोर’या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
नुकताच नीना गुप्ता यांचा सरदार का ग्रॅण्डसन हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटात नीना गुप्तांची मुख्य भूमिका आहे. यात त्या एका ९० वर्षीय आजीची भूमिका साकारत असून तिचं नावं सरदार कौर आहे. या सिनेमाला आणि नीना गुप्ता यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.
नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. रिपोर्टनुसार नीना गुप्ता यांचे पहिले अफेअर अलोक नाथ यांच्यासोबत होते, मात्र हे कमी वेळासाठी होते.
विवियन रिचर्ड्स जेव्हा १९८० साली भारतात दौ-यावर आले होते तेव्हा त्यांची एका कार्यक्रमात अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या सोबत झाली. पहिल्या भेटीतच ते एकमेंकाच्या प्रेमात पडले. नीना रिचडर्सच्या प्रेमात आकंड बुडाल्या. रिचडर्स यांचे लग्न झाले असतानाही नीना यांनी त्यांच्यासोबत संबंध ठेवला. त्यातून नीना आणि रिचडर्स यांना एक मुलगी झाली. नीना गुप्तांनी बाळाच्या वडिलांचं नाव कधीच जाहीर केलं नव्हतं. मात्र एका वृत्तपत्रात मसाबाचं बर्थ सर्टिफिकेट छापून आलं आणि खळबळ उडाली. नीना गुप्ता यांनी विविअनसोबत आपण कधीच भावनिकरित्या गुंतलो नसल्याचं सांगितलं होतं. विविअन रिचर्ड्स यांनी मसाबा ही आपली कन्या असल्याचं कबूल केलं. ते नीना-मसाबा यांना भेटायला नेहमी मुंबईला येत असत. मात्र नीना गुप्ता यांनी सिंगल मदर हीच स्वतःची ओळख कायम ठेवली. आता ती मुलगी ३१ वर्षाची असून तिचे नाव मसाबा ठेवण्यात आले. सध्या ती मॉडेलिंगमध्ये करिअर बनवित आहे. विवियन रिचर्ड्स यांची भारतीय मुलगी आपली आई नीना गुप्ताला रोल मॉडेल मानते. मसाबा आज एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. मोठे-मोठे फॅशन शोमध्ये तिने डिझाइन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन लागते. मसाबाने विल्स लायफस्टाईलचे कित्येक अवार्ड्स जिंकली आहेत. सिनेनिर्माता मधु मंटेनासोबत नीना गुप्ता यांची मुलगी आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताचे लग्न झाले होते. २०१५ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. मात्र या दोघांचेही लग्न फार काळ काही टिकले नाही. २००८ मध्ये नीना यांनी विवेक मेहरा सोबत लग्न केले आहे. माहितीनुसार विवेक विवाहित होते. पण ते आधीच विभक्त झाले होते. विवेक आणि नीना यांनी एकमेकांना ६ वर्षे डेट केलं होतं. जुलै २००८ मध्ये दोघे युएसमध्ये एक लग्न अटेंड करण्यासाठी गेले होते. तिथेच विवेक यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली. नीना गुप्ता या सोशल मीडियावरही बऱ्याच अॕक्टीव्ह असतात. त्या आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून त्यांच्या चित्रपटांविषयी माहिती देत असतात. ‘सच कहूं तो’हे नीना यांचं आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात त्यांच्या फिल्मी करियरपासून ते व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. यात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून सुरू झालेल्या प्रवासापासूनची कहाणी आहे. माजी क्रिकेटपटू व्हिव्हीयन रिचर्डसोबतची रिलेशनशीप, त्यातून जन्माला आलेलं मुलगी यासह आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा या पुस्तकात आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकातून नीना गुप्ताच्या आयुष्यातील चढउतार वाचायला मिळणार आहे.