जन्म. ४ जुन १९४७
मराठी चित्रपट सृष्टीत मामा अशी ओळख असणारे अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. अशोक सराफ हे मूळचे बेळगावचे. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. ज्येष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्या मुळे त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले. आपली पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही हिंदी उल्लेखनीय चित्रपट केलेले आहे. अशोक सराफ यांची खरी ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून असली तरी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतका हरहुन्नारी भूमिका साकारणारा कलाकार दुर्मिळच आहे. क्रूरकर्मा खलनायक ते उत्तम बंडू तुपे यांच्या भस्मवर आधारित चित्रपटातील भस्म्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्या विनोदी भूमिकाही प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत. अशोक सराफ-दादा कोंडके, अशोक सराफ-लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ-सचिन, अशोक सराफ-महेश कोठारे या जोड्या मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेल्या आहेत. अशोक सराफ यांच्या नावावर प्रेक्षक आजही चित्रपट पाहायला जातात कारण प्रेक्षकांना पूर्णपणे ठाऊक असते की त्यांचा चित्रपट पैसे वसूल करून देणारा असतो. अशोक सराफ यांना “अशोकमामा’ या नावानेच अनेकजण ओळखतात, संबोधतात. मात्र, हे नाव कसे आणि कुणी दिले, हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. हे नाव आपल्याला कसे पडले, याचा उलगडा खुद्द अशोक सराफ यांनीच केला. अशोकमामाचे बारसे कसे झाले, याविषयीचा किस्सा सांगताना, अशोक सराफ म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाच्या कॅमेरामनबरोबर त्यांची मुलगी येत असे. सेटवर आली की ती विचारत असे, हे कोण? त्या कॅमेरामनने सांगितले, हे अशोक सराफ.. पण त्यांना तू अशोकमामा म्हणायचे. आणि झालं, तिने अशोकमामा म्हणायला सुरवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच सेटवर जो कोणी येईल, ते सर्वजण मला अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. अशोकमामाचे नामकरण अशा पद्धतीने झाल्याचा किस्सा खुद्द अशोक सराफ यांनीच सांगितला. आता एखाद्या सुंदर मुलीने मामा म्हणून हाक मारल्यावर तितकाच हिरमोडही होतो, अशी मिश्किाल टिप्पणी ते लगेच करुन टाकतात. मला थेट “अशोक’ अशी हाक मारणारे तसे कमीच. “अशोकजी’ असे कुणी म्हटले, तर ते माझी मलाच झेपत नाही. तर अशोक सर वगैरे माझ्या प्रकृतीतच बसत नाही. सेटवर किंवा इतरत्र गर्दीच्या ठिकाणी चाहत्यांमधून येणाऱ्या “अशोकमामा’, या हाकेतला गोडवाच आपल्याला अधिक भावतो. अशोक सराफ यांना अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळाले आहेत.
अशोक सराफ यांची कारकीर्द
मराठी चित्रपट
आई नं. वन , आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला , गंमत जंमत , भुताचा भाऊ , माझा पती करोडपती, एक उनाड दिवस ,अफलातून , गोंधळात गोंधळ, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा , सगळीकडे बोंबाबोंब , आयत्या घरात घरोबा , कुंकू ,बळीराजाचं राज्य येऊ दे , घनचक्कर , तू सुखकर्ता ,नवरा माझा नवसाचा , वजीर, अनपेक्षित, एकापेक्षा एक, चंगू मंगू , शुभमंगल सावधान, नवरा माझा ब्रम्हचारी ,आमच्या सारखे आम्हीच ,बाळाचे बाप ब्रम्हचारी, प्रेम करू या खुल्लम खुल्ला ,गोष्ट धमाल नाम्याची, पांडू हवालदार, राम राम गंगाराम,अरे संसार संसार , कळत नकळत, आपली माणसं, धूमधडाका ,एक डाव धोबीपछाड,आयडियाची कल्पना.
हिंदी चित्रपट
कुछ तुम कहो कुछ हम कहें , बेटी नं. वन , कोयला , गुप्त, संगदिल सनम, जोरू का गुलाम, खूबसूरत, येस बॉस, करण अर्जुन ,सिंघम
नाटके
हमीदाबाईची कोठी,अनधिकृत, मनोमिलन, हे राम कार्डिओग्राम, डार्लिंग डार्लिंग, सारखं छातीत दुखतंय
दूरदर्शन मालिका
टन टना टन (ई.टीव्ही मराठी) , हम पांच (झी वाहिनी), डोन्ट वरी, हो जाएगा (हिंदी), छोटी बडी बाते.
संजीव वेलणकर , पुणे