गुंतवणुकीच्या दृष्टीने बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूक योग्य ठिकाणी केली गेली तर परतावाही निश्चितच चांगला असतो. बहुतांश जणांचा ओढा हा शेअर बाजाराकडे आहे. परंतु, यात जोखीमही तितकीच असते. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसह हमखास परताव्यासाठी पोस्ट ऑफिसमधील योजनांचा चांगला फायदा होऊ शकतो.
एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटच्या निमित्ताने गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. ‘झी बिझनेस हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. बऱ्याचदा तुमच्याकडे पैसे असतात परंतु, एखाद्या योजनेत पैसे गुंतवण्याची मर्यादा ठरवून दिलेली असते.
पोस्ट ऑफिसच्या छोट्या गुंतवणूक योजनेत गुंतवणुकी संदर्भात कमाल मर्यादा ठरलेली नाही. विशेष म्हणजे यात अनेक अकाउंट उघडता येऊ शकतात आणि टॅक्समध्ये सूटही मिळते. पोस्टाच्या योजनेत अजूनही बरेच काही फायदे आहेत.
एनएससीत असा मिळू शकतो दुहेरी फायदा
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट योजनेत पाच वर्षांची मुदत आहे. यावर वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळत राहील. व्याजावर दुहेरी फायदा मिळतो. म्हणजेच वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज मिळतं. यात योजना सुरू असताना पैसे काढता येत नाहीत. योजनेची मुदत संपल्यावरच पूर्ण रक्कम मिळते. पोस्ट ऑफिसच्या वेबाइटनुसार, जर योजनेत 1,000 रुपये जमा केले गेले तर पाच वर्षांनंतर तुम्हाला 1389.49 रुपये मिळतील.
10 लाखांवर जमा होतील 13.89 लाख रुपये
पोस्ट ऑफिसच्या एनएससीच्या कॅलक्युलेटरनुसार, योजनेत एकरकमी 10 लाख रुपये जमा केलं गेलं तर पाच वर्षांची मुदत संपल्यावर एकूण 13,89,493 रुपये मिळतील. यात 3,89,493 रुपये निव्वळ व्याज मिळेल.
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटमध्ये कुठल्याही पोस्ट ऑफिसमधून गुंतवणूक करता येऊ शकते. एनएससीचे अकाउंट किमान 1,000 रुपये टाकून काढता येऊ शकतं. याची कमाल मर्यादा नाही. योजनेत 100 रुपयांच्या पटीत पैसे गुंतवता येऊ शकतात. यात केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
मुलांच्या नावावर काढता येईल खातं
नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेटला देशातील कुठल्याही पोस्ट ऑफिस कार्यालयातून काढता येऊ शकतं. कुठलाही नागरिक यात अकाउंट उघडू शकतो. यात ज्वॉईंट अकाउंटही उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
10 वर्षांवरील मुलांचे आई-वडिल त्यांच्या जागी सर्टिफिकेट खरेदी करू शकतात. एनएससीमध्ये पाच वर्षांच्या आधी पैसे काढता येत नाहीत. काही विशेष परिस्थिती उदभवली तर यातून सूट मिळू शकते. सरकार दर तीन महिन्यांनी एनएससीसाठी व्याजदराचे पुनरावलोकन करते.
या आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी
एनएससीला कुठल्याही भारतीय पोस्ट कार्यालयातून खरेदी करता येऊ शकतं. वार्षिक स्वरुपात व्याज जमा केलं जातं. परंतु, योजना पूर्ण झाल्यावरच पैसे दिले जातात. सर्व बँका आणि एनबीएफसीद्वारे कर्ज घ्यायचं असेल तेव्हा कोलॅटरल किंवा सुरक्षा म्हणून एनएससी स्वीकारलं जातं.
गुंतवणूकदार त्याच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतो. एनएससी काढल्यानंतर ते मुदत संपेपर्यंत कितीदाही एकाच्या व्यक्तीच्या नावाचं सर्टिफिकेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करता येऊ शकतं.