आज दि.५ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

ब्रिटनचा ट्रस्ट लिज ट्रस यांच्यावरच! पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पराभूत

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचा नवीन पंतप्रधान कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिज ट्रस यांच्यात पंतप्रधानपदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. अखेर आज ब्रिटनचा नवीन पंतप्रधान कोण असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून लिज ट्रस यांचा विजय झाला आहे.

‘पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा,’ मराठी शाळांची संख्या वाढवण्यासाठी गुलाबरावांचा वादग्रस्त सल्ला

देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

‘सुप्रिया सुळेंना वाटतं त्यांचे वडीलच राज्याच्या राजकारणात..’, गोपीचंद पडळकरांचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना असे वाटते की त्यांचे वडील शरद पवारसाहेबच राज्याच्या राजकारणात बदल करू शकतात, या शब्दात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरावरुन त्यांनी हे वक्तव्य केले.

गौरीच्या मुखवट्याला घातले सात तोळे सोन्याचे दागिने, चोरट्यांनी साधला डाव 

राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मात्र, सणासुदीमध्ये चोरटे आपले हात साफ करताना दिसत आहेत. मालेगावमध्ये अशीच एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. गौरीच्या मुखवट्याला घातलेले सात तोळ्यांचे दागिने चोरट्यानी लंपास केले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.पन्हाळा तालुक्यातील मालेगावात ही घटना घडली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घरातील लोक झोपेत असताना चोरट्यानी कडी कोयंडा उचकटला आणि घरात प्रवेश केला. अरुण चौगले यांच्या घरी ही चोरी झाली आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली तेव्हा घरातील लोक झोपले होते. याचाच चोरट्यांनी फायदा घेत आपला डाव साधला.

सायरस मिस्त्रींची गाडी चालवणाऱ्या महिला डॉक्टर ग्रीन कॉरिडोरने मुंबईत

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. रविवारी रात्री उशिरा जेजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम केलं. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यामध्ये सायरस मिस्त्री यांची लग्झरी कार रस्त्याच्या डिव्हायडरला जाऊन आपटली, यात गाडीमध्ये मागे बसलेल्या सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. ही कार मुंबईच्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ अनाहिता पंडोले चालवत होत्या. अनाहिता यांच्यासोबत पुढे त्यांचे पती डेरियस पंडोले बसले होते. सध्या या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.अनाहिता पंडोले आणि त्यांचे पती डेरियस पंडोले यांना सोमवारी सकाळी ग्रीन कॉरिडोर बनवून वापीच्या रेनबो हॉस्पिटलमधून मुंबईच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍम्ब्युलन्सने शिफ्ट करण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ऍम्ब्युलन्स वापीहून सकाळी 6 वाजता रवाना झाली आणि सकाळी 9 वाजता मुंबईत पोहोचली.

येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

बंगळुरूत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी पूरपस्थिती; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

देशात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे तर दुसरीकडे काही राज्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. तर आसाम, बंगळुरू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. बंगळुरुमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यास प्राधान्य : आझाद 

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी पहिला मेळावा घेऊन नवीन पक्षाची ध्येयधोरणे जाहीर केली. यामध्ये जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे, राज्यातील नागरिकांच्या भूमी आणि रोजगाराच्या अधिकारांचे रक्षण तसेच काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रमुख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“हा तर खलिस्तानी, संघातून बाहेर काढा,” भारत-पाक सामन्यात झेल सोडल्यामुळे अर्शदीप सिंगवर केली जातेय टीका

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत रविवारी (३ सप्टेंबर) झालेला भारत-पाकिस्तान सामना अनेक कारणांमुळे संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी भारतीय संघाने विजयासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आणि प्रशंसनीय होते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर तर अर्शदीप सिंगला थेट खलीस्तानी म्हटले जात आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.