राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ३४ वरून ३८ टक्के झाला आहे. वित्त विभागाने याबाबतचा आदेश प्रसृत केला आहे. त्यानुसार १ जुलै २०२२ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेच्या मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह यंदाच्या जानेवारी महिन्यातील वेतनाबरोबर रोखीने देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत.