आधी शेअर कोसळले आता FIR दाखल! रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ

बाबा रामदेव यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे शेअर कोसळले होते. अशातत आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. रविवारी एका स्थानिक व्यक्तीने धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील चौहान पोलीस ठाण्यात योगगुरू स्वामी रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. चौहानचे पोलीस अधिकारी भुताराम यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी पठाई खान यांनी रविवारी धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (ए), 295 (ए) आणि 298 नुसार गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे.

गुरुवारी बाडमेरमध्ये झालेल्या संतांच्या मेळाव्यात योगगुरू बाबा रामदेव यांनी हिंदू धर्माची इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माशी तुलना केली आणि मुस्लिमांवर दहशतवादाचा आणि हिंदू मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला. योगगुरू बाबा रामदेव यांनी आरोप केला की इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्मांना धर्मांतराचे वेड लागले आहे, तर हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले जीवन जगण्यास शिकवतो.

यापूर्वीही वादग्रस्त विधाने

बाबा रामदेव हे त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. यापूर्वी पतंजली योगपीठावर 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते म्हणाले होते की, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील. ते म्हणाले, “सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर ही सर्व स्वतंत्र राष्ट्रे होतील आणि पाकिस्तान वेगळा देश राहील.”

तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले, की स्त्रिया साडी, सलवार कमीज किंवा “काहीही न घालता” देखील छान दिसू शकतात. या वक्तव्यानंतरही त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.