पाकिस्तान सुपर लीगच्या २०२३ची सुरुवात १३ फेब्रुवारीपासून होणार आहे. दरम्यान, स्पर्धेच्याआधी क्वेटा ग्लेडियेटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात एक प्रेक्षणीय सामना झाला. या सामन्यात इफ्तिखार अहमदने वेगवान गोलंदाज वहाब रियाजची धुलाई केली. अखेरच्या षटकात इफ्तिखारने ६ चेंडूत ६ षटकार खेचले.
इफ्तिखार क्वेटा ग्लेडिएटर्सचा खेळाडू आहे. या संघाचा कर्णधार सरफराज अहमद आहे. तर पेशावर जाल्मीचा कर्णधार बाबर आझम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली शाहिद आफ्रिदीसारखा दिग्गज खेळाडुसुद्धा पीएसएलच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत.
सामन्यात क्वेटाकडून इफ्तिखार अहमदने जबरदस्त अशी नाबाद ९४ धावांची खेळी केली. बाबरने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पेशावर जाल्मीची गोलंदाजीची सुरुवात चांगली होती पण दुसऱ्या बाजूने इफ्तिखार अहमदने जोरदार फटकेबाजी केली.
डावाच्या अखेरच्या षटकात इफ्तिखारने वहाब रियाजच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसे काढली. पहिल्या तीन चेंडूवर षटकार मारल्यानंतर स्टेडियमवर प्रेक्षकांनी जल्लोष केला. त्यानतंर वहाबने अँगल बदलला पण तरीही इफ्तिखारने त्याची फटकेबाजी थांबवली नाही. अखेरचे तीन चेंडुही इफ्तिकारने स्टेडियममध्ये भिरकावले. त्याच्या खेळीच्या जोरावर क्वेटाने २० षटकात १८५ धावा केल्या.शेवटच्या षटकात महागडा ठरलेल्या वहाबची आधीची षटके चांगली होती. त्याने तीन विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा वाहणाऱ्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेला वहाब आता फक्त पीएसएलमध्ये खेळताना दिसतो.