मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांची नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांनी नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. हा कार्यक्रम पाहून राज ठाकरे भारावून गेले. त्यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपले नितीन गडकरींसोबत विचार का जुळतात यामागचं कारण सांगितलं.
“माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्व बांधवानो, मी असा शो आजपर्यंत भारतात कधी पाहिलेलं नाही. जे काही पाहिंल आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलं आहे. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्यदिव्यच असतं. ते काही खाली करतच नाहीत ते सर्व वरुनच करतात. कारंजा वरुन जातो, स्कायवॉकही वरुन जातो. सर्व वरच जातं. आमचे दोघांचे विचार जुळण्यामागचं कारण म्हणजे आमच्या दोघांचा विचार भव्यदिव्य असतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
“नितीन जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ते कसं होईल, असं वाटतं. पण ते झाल्यावंर समजतं की तसं होऊ शकतं. नितीनजी नागपूरला येण्याचं आणखी एक कारण शोधलंत. संत्रानगरीत स्वागत असं म्हटलं जायचं. आता कारंजानगरीत स्वागत असं म्हणावं लागेल. त्यामुळे जे काही मी आज पाहिलं ते अद्भूत आहे. देशभरातील लोक हा शो पाहण्यासाठी नागपुरात येतील”, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.
यावेळी नितीन गडकरी यांनीदेखील राज ठाकरेंचं कौतुक केलं. “राज ठाकरे स्वत: एक कलाकार आहेत. चित्रकलापासून साहित्यापर्यंत आणि कारकूनपासून ते संगीतापर्यंत या सगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ कलाकार आहेत. विशेष आनंदाची गोष्ट आहे. ज्यांच्या नावाने आपण या फाऊंडेशनचं नाव स्वर्गीय लता मंगेशकर असं करणार आहोत यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. लता मंगेशकर यांचं राज ठाकरेंचं पुत्रवत प्रेम होतं. ते आज नागपुरात आले म्हणून त्यांना मी निमंत्रण दिलं. ते इथे आले त्याचा मला आनंद झाला”, असं नितीन गडकरी म्हणाले.