नाशिकमध्ये आज बुधवार 15 डिसेंबरपासून नदी महोत्सवाला सुरुवात होत आहे. 21 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य पुरातत्व विभाग आणि नाशिक इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात नागरिकांना गोदावरीचा इतिहास, गोदावरीच्या परिसराची माहिती मिळणार आहे. सोबतच वारसा फेरी, व्याख्याने अशा भरपूर कार्यक्रमांचा लाभ घेता येणार आहे.
पहिल्या दिवशी आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता गोदेची वारसा फेरी होणार आहे. रमेश पडवळ आणि देवांग जानी हे संयोजक व मार्गदर्शक आहेत. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची उपस्थिती राहणार आहे. रामकुंडासमोरील मामलेदार मंदिरासमोर हा कार्यक्रम होईल.
गुरुवारी, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नदी संस्कृती या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी नदीच्या अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता बस्ते या मार्गदर्शन करणार आहेत. सरकारवाडा येथील दरबार हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोदाघाटचे नाशिक या विषयावर व्याख्यान रंगणार आहे. यावेळी डॉ. कैलास कमोद हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रमही सरकारवाड येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे.
शनिवारी, 18 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता गोदाकाठचे जीवन या विषयावर व्याख्यान होईल. गाडगे महाराज धर्मशाळा येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्रा. आनंद बोरा यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता जल प्रदूषण या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी प्रा. व्ही. बी. गायकवाड हे मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे.
रविवारी, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्राचीन नाण्यांमधील नदी या विषयवार चेतन राजापूरकर यांचे व्याख्यान होईल. सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी, 20 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिकची गोदावरी या विषयावर व्याख्यान होईल. यावेळी गोदावरीच्या अभ्यासक डॉ. शिल्पा डहाके मार्गदर्शन करतील. सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी, 21 डिसेंबर रोजी नदी महोत्सव या उपक्रमाचा समारोप होईल. यादिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ऊर्ध्व गोदावरी नदीवरील आधुनिक पूर, कारणे आणि परिणाम या विषयावर व्याख्यान होईल. प्रा. प्रमोद हिरे यावेळी मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये होईल