युक्रेनमधील संघर्षांमुळे अन्न आणि इंधन महागाई वाढल्याचे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी येथे शनिवारी केले. इंधन महागाईवाढ हे सध्याचे सर्वात मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारत-संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात केलेल्या भाषणात जयशंकर म्हणाले की, भारत आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा तो एक विकसित देश असेल.
भारताने अलीकडच्या काही वर्षांत अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका, येमेन आणि अन्य देशांना अन्नधान्याचा पुरवठा केल्याचे त्यांनी नमूद केले. युक्रेनमधील संघर्षांमुळे अन्न आणि इंधन महागाई वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी भारताकडून मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या. डिसेंबरमध्ये भारताकडे जी-२०चे अध्यक्षपद आल्यानंतर वातावरण बदलाच्या विषयात अधिक चांगले काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.