ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्यपदावरील नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. सातही दशनामी संन्यासी आखाडय़ांनी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिषपीठाचे शंकराचार्य म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.
निरंजनी आखाडय़ाचे सचिव आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी सांगितले, की अविमुक्तेश्वरानंद यांना शंकराचार्य म्हणून घोषित करणे नियमबाह्य आहे. या नियुक्तीची एक प्रक्रिया असून संन्यासी आखाडय़ांच्या संमतीनंतर काशी विद्यालय परिषद शंकराचार्य निवडते. या मुद्दय़ावर सर्व संन्यासी आखाडय़ांची लवकरच बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येईल.
ज्योतिषपीठ आणि द्वारका
शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे ११ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार अविमुक्तेश्वरानंद यांना ज्योतिषपीठाचे नवे शंकराचार्य म्हणून घोषित करण्यात आले होते.