भारताच्या युवा संघाने जबरदस्त खेळ दाखवत वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. काल झालेल्या सेमीफायनलच्या दुसऱ्या लढतीत भारताच्या अंडर 19 टीमने ऑस्ट्रेलियावर तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचे नायक ठरले कॅप्टन यश धुल आणि शेख राशीद. या दोघांनी विजयाचा पाय रचला. यश धुलने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवत (110) शानदार शतकी खेळी केली. त्याला राशीदने (94) मोलाची साथ दिली. त्याचं शतक अवघ्या सहा धावांनी हुकलं.
भारताने विजयासाठी दिलेल्या 291 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या प्रभावी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 194 धावांवर आटोपला. भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवून सलग चौथ्यांदा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
फायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडच आव्हान असणार आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला नमवून 24 वर्षानंतर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. कालच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर अत्यंत सहज मात केली. ऑस्ट्रेलियाला एकदाही डोकवर काढण्याची संधी दिली नाही. संपूर्ण संघाने सांघिक खेळाचं प्रदर्शन केलं. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर गोलंदाजांनी आपल काम चोख बजावलं.
ऑस्ट्रेलियाकडून फक्त लाचलन शॉ ने (51) अर्धशतकी खेळी केली. त्या व्यतिरिक्त अन्य फलंदाज संघाला गरज असताना मोठी खेळी करु शकले नाही. लाचलन शॉ चा अडसर वेगवान डावखुरा गोलंदाज रवी कुमारने दूर केला. त्याने शॉ ला क्लीन बोल्ड केलं. पुणेकर विकी ओस्तवालच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज निष्प्रभ ठरले. विकी ओस्तवालने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. रवी कुमार, निशांत सिंधूने प्रत्येकी दोन तर कौशल तांबे, अंगक्रिष रघुवंशीने एक विकेट घेतला.
यश धुल आणि शेख राशीद फलंदाजीसाठी मैदानावर उतरले, तेव्हा संघाच्या दोन बाद 37 धावा होत्या. त्यांनी त्या कठीण परिस्थितीतून डाव सावरला व एक मोठे लक्ष्य उभारले. यश आणि राशीदने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यश धुलने 110 चेंडूत 110 धावांची खेळी केली. त्याने 10 चौकार आणि एक षटकार लगावला. शेख राशिदने 108 चेंडूत 94 धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला.