आज दि.८ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारताचा मित्र इस्राइलने मालदीवला दाखवला आरसा; लक्षद्वीपबाबत केली मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांना मिरची लागली होती. या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मालदीव सरकारने यावर कारवाई केली असली तरी दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यातच भारताचा मित्र असलेल्या इस्राइलने मालदीवला आरसा दाखवत लक्षद्वीवपच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. इस्राइलकडून यांसदर्भात अधिकृतरित्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. इस्राइलने घोषणा केलीये की, उद्यापासूनच म्हणजे मंगळवारपासूनच केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीपच्या समुद्राचे पाणी साफ करण्याचा प्रोजक्ट हाती घेण्यात येणार आहे. भारत आणि मालदीवमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्राइलचं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.

इस्राईलवर पुन्हा रॉकेट हल्ला; ‘हल्ले थांबवा नाहीतर दुसरे युद्ध उत्तर सीमेवर….’ दिला थेट इशारा

लेबनॉनमधील दहशतवादी संघटनेने सोमवारी इस्राईलच्या उत्तर भागातील एका हवाई तळावर रॉकेट हल्ला केला. या रॉकेट हल्ल्यात या तळाचे किरकोळ नुकसान झाले. इस्राईलने मात्र हा प्रकार अत्यंत गांभीर्याने घेतला असून पुन्हा असा हल्ला झाल्यास दुसरे युद्ध उत्तर सीमेवर होईल, असा सज्जड दम भरला आहे.हिज्बुल्ला आणि हमास या एकमेकांना सहकार्य करणाऱ्या दहशतवादी संघटना आहेत. गाझा पट्टीतील युद्ध सुरू झाल्यापासूनच इस्राईलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबनॉनमधून हिज्बुल्लानेही हल्ले सुरू केले होते. हल्ले सातत्याने होत असले तरीही काही रॉकेट हल्ले आणि सीमेवरील गोळीबार एवढेच मर्यादित त्याचे स्वरूप होते.

श्रीरामाच्या अयोध्येत नागपूरची ‘शिवगर्जना’! ढोल, ताशांच्या वादनाने अयोध्यानगरी होणार मंत्रमुग्ध

अयोध्येतील राम मंदिराचे उद्‍घाटन पंधरा दिवसांवर आले आहे. त्यामुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. शहरातदेखील ठिकठिकाणी यानिमित्त नियोजन सुरू आहे. या शुभपर्वावर नागपूरकरांसाठी गौरवाची बाब म्हणजे शहरातील शिवगर्जना ढोलताशा पथकाला या उत्सव काळात २४ व २५ जानेवारी रोजी अयोध्येत रामलला मंदिर परिसरात ढोलताशा वादनाचा मान मिळाला आहे.

या कार्यासाठी शहरातील १११ वादक तरुण-तरुणी २३ जानेवारीला नागपूर येथून अयोध्येकरिता रवाना होणार आहेत. यामध्ये ४० ते ५० ढोल, २० ते २५ ताशे, २१ ध्वज आणि १० झांज पथकांचा समावेश आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी शिवगर्जना ढोलताशा पथकाला निमंत्रण पाठविले आहे. यानुसार २४ जानेवारी रोजी होणाऱ्या शंखनादादरम्यान ढोलताशा पथक सादरीकरण करीत सेवा देईल. तर २५ जानेवारी रोजी घोषवादन होईल.

दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्द केला

बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या ११ दोषींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता. हा निर्णय सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवला आहे. दोषींना सोडण्याचा अधिकार सरकारला असतो पण इथं गुजरात सरकारला याचा अधिकार नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. 

राजस्थानमधील भाजप सरकारला मोठा धक्का, मंत्रीच पराभूत

तीन आठवड्यांपूर्वी सत्तेत आलेल्या राजस्थानमधील भाजप सरकारला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारमधील मंत्री सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा निवडणुकीत ११ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने उमेदवार असलेल्या सुरेंद्रपाल यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता, पण निवडणुकीत त्यांची डाळ शिजू शकली नाही.

आकाश चोप्राने केले मोठे विधान; म्हणाला, “टी-२० वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार…”

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणतो की, २०२४च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्या नसून रोहित शर्मा असेल. त्याने आपल्या दाव्यामागे हार्दिक पंड्याचा फिटनेस हे सर्वात मोठे कारण असल्याचे सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही आणि आता तो थेट आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे, त्यामुळे तो कर्णधार होण्याची शक्यता कमी आहे.

12 षटकार अन् 56 चेंडूत धुंवाधार शतक! परागने ठोठावला थेट टीम इंडियाचा दरवाजा

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान परागने रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर अनेक खेळाडू टीम इंडियामध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे ठोठावताना दिसत आहेत. त्याने छत्तीसगडविरुद्ध आपल्या घरच्या संघ आसामसाठी झंझावाती शतक झळकावले.

रणजी ट्रॉफीच्या ब गटातील छत्तीसगडविरुद्धच्या चौथ्या सामन्यात त्याने 56 चेंडूत शतक झळकावले. रायपूरमध्ये त्याने 12 षटकार आणि 11 षटकार मारले. परागने रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले आहे. 87 चेंडूत 155 धावा करून तो बाद झाला.

रणबीर कपूर-आलिया भट्ट २२ जानेवारीला जाणार अयोध्येला? दोघांनाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. आत्तापासूनच अयोध्येत पयर्टकांची गर्दी सुरु आहे. राजकारणींपासून अनेक बॉलीवूड कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी रणबीर व आलियाची भेट घेत त्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. सोशल मीडियावर याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकण राज्य प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माते महावीर जैन यांच्याकडून रणबीर व आलियाला या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. रणबीर व आलियाने हे निमंत्रण स्विकारले असून ते या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.