B2B ई-कॉमर्स कंपनी IndiaMART च्या कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने आपल्या कर्मचार्यांना दर आठवड्याला पगार देणारे नवीन साप्ताहिक वेतन धोरण जाहीर केले आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल आणि ते अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होतील.
एक लवचिक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी आणि आमच्या कर्मचार्यांचे आर्थिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी साप्ताहिक वेतन देय धोरण स्वीकारणारी IndiaMART ही भारतातील पहिली संस्था बनली आहे, असे IndiaMART ने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
साप्ताहिक पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने या पोस्टसोबत एक फोटोही पोस्ट केला आहे. फोटोमध्ये लिहिले आहे, “तुमचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी उचललेले पाऊल.”
विकली पेमेंट कर्मचार्यांच्या निरोगीपणाला चालना देण्यासाठी एक पाऊल असल्याचे म्हटले जाते. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग आणि यूएस मध्ये हे आधीच सामान्य आहे. भारतात आत्तापर्यंतच्या सामान्य पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी पगार मिळतो.
हे भारतातील सर्वात मोठ्या B2B मार्केटप्लेसपैकी एक आहे. हे खरेदीदारांना विक्रेत्यांशी जोडणारे व्यासपीठ म्हणून काम करते. या कंपनीचा पाया 1999 मध्ये घातला गेला आणि व्यवसाय करणे सोपे करणे हे या कंपनीचे ध्येय आहे. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, या प्लॅटफॉर्मवर सध्या 143 दशलक्ष खरेदीदार सक्रिय आहेत तर 70 लाख पुरवठादार सक्रिय आहेत.