गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पश्चिम बंगाल सरकारनेही दुखवटा म्हणून आज सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तसेच आजपासून 15 दिवस राज्यातील सर्व सरकारी ठिकाणे, सरकारी कार्यालये आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांचीच गाणी वाजवण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. लतादीदींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे.
लतादीदींच्या निधनानंतर अनेक राज्यांनी दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र सरकारनेही दुखवटा जाहीर केला असून मंत्रालयावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारने महाराष्ट्रात आज सोमवारी सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
ममता बॅनर्जी यांनी लता मंगेशकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील पंधरा दिवस सर्व सार्वजनिक ठिकाणी, सरकारी इमारती आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांची गाणी वाजवली जातील, असं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. तसेच सोमवारी राज्यात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मी देशाच्या महान व्यक्तिमत्त्व भारत रत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करते. मंगेशकर कुटुंबीय आणि जगभरातील त्यांच्या अब्जावधी चाहत्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करत आहे. त्या खरोखरच भारताच्या गानकोकिळा होत्या. जगभरातील रसिकांप्रमाणेच मीही त्यांच्या आवाजाची प्रशंसक होते. त्यांच्या गाण्याची चाहती होते. त्यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना प्रोत्साहन दिलं आणि स्नेह दिला त्याबद्दल त्यांचे आभारी आहे. तसेच संगीताच्या दुनियेत या कलाकारांना त्यांनी अभिन्न मानलं, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी दीर्घ आजाराने निधन झालं. त्या तब्बल 28 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्या उपचाराला प्रतिसादही देत नव्हत्या. अखेर आज सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर केंद्र आणि राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे.