देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळणार आहे. महामारीविरोधातील लढ्यात भारताला आणखी एका लसीचे सामर्थ्य लाभले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने केवळ एक डोस पुरेसा असलेल्या स्पुतनिक लाइट या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने या लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्याबाबत शिफारस केली होती. त्याला अनुसरून डीसीजीआयने मंजुरी दिली आहे. ही लस भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील नववी कोरोना लस असेल. मात्र नऊही लसींमध्ये स्पुतनिक लाइट ही एकमेव सिंगल डोसवाली लस आहे. त्यामुळे या लसीचा एक डोस कोरोनाचा प्रतिकार करणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ट्विट करून दिली माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज (रविवारी) ट्विटरवरून ही खुशखबर दिली. या लसीच्या वापरामुळे कोरोना महामारीविरोधातील सामूहिक लढ्याला आणखी बळकटी मिळेल, असे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी केले आहे. “डीसीजीआयने भारतात सिंगल-डोसवाल्या स्पुतनिक लाइट लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी दिली आहे. देशातील ही नववी कोविड-19 प्रतिबंधक लस आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध देशाच्या सामूहिक लढ्याला आणखी बळ मिळेल,” असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटच्या शिरकावाची भिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
स्पुतनिक लाईट ही रशियाने विकसित केलेली दुसरी कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीचा केवळ एक डोस घ्यावा लागेल. सीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने दोन दिवसांपूर्वीच या लसीच्या वापराबाबत शिफारस केली होती. ती शिफारस तातडीने मंजूर करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत ज्या आठ कोरोना प्रतिबंधक लसींचा वापर होत आहे, त्या सर्व लसी डबल डोसवाल्या आहेत. मात्र स्पुतनिक लाईट ही एकमेव सिंगल डोसवाली लस आहे. याआधी रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
Sputnik Lite ही एकच डोस असलेली लस कोरोनाच्या संसर्गावर भारी प्रभावी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ही लस तब्बल 93 .5 टक्के प्रभावी आहे. केवळ एक डोस एवढा प्रभावी असल्यामुळे दुसऱ्या डोसची गरज भासत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ही लस ‘बूस्टर डोस’ म्हणूनदेखील खूप प्रभावी आहे. या लसीचा बूस्टर डोस Omicron व्हेरिएंटविरुद्ध 100% प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.