अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाच्या अरुण सुब्रमण्यम यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

भारतीयांची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. जगभरातील मोठ्या कंपन्यांच्या CEO पदी भारतीय वंशाच्या दिग्गजांची निवड झाली आहे. आता पुन्हा एकदा भारतीयांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. भारतीय वंशाचे अरुण सुब्रमण्यम यांची दक्षिण आशियाचे पहिले जज म्हणून निवड झाली आहे. याशिवाय ते न्यूयॉर्क जिल्ह्याचे जज म्हणून पदाभार स्वीकारणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय जाहीर केला. अरुण सुब्रमण्यम हे न्यूयॉर्क इथल्या दक्षिण जिल्ह्यातील न्यायालयाची सेवा करणारे पहिले दक्षिण आशियाई जज असणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

न्यूयॉर्क जिल्हा कोर्टामध्ये अरुण सुब्रमण्यम यांच्या व्यतिरिक्त इतर नावांची देखील शिफारस करण्यात आली होती. मंगळवारी हा प्रस्ताव सिनेटमध्ये पाठवण्यात आला. जो बायडन यांनी अरुण सुब्रमण्यम यांच्या नावावर शिक्कमोर्तब केला आहे.

सुब्रमण्यम सध्या न्यूयॉर्कमधील लॉ फर्म सुसमन गॉडफ्रे एलएलपीमध्ये भागीदार आहेत. 2007 पासून ते येथे काम करत आहेत. त्यांनी 2006 ते 2007 या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेड जिन्सबर्गसाठी लिपिक म्हणून काम केले.

यापूर्वी त्यांनी 2005 ते 2006 या काळात न्यूयॉर्कच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात न्यायमूर्ती जेरार्ड ई लिंचसाठी काम केले. 2004 ते 2005 पर्यंत ते अपील कोर्टाचे न्यायाधीश डेनिस जेकब्स यांचे लॉ लिपिक होते.

सुब्रमण्यम यांनी 2004 मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून जेडी पदवी प्राप्त केली आणि 2001 मध्ये वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीमधून बीए केले. यापूर्वी नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशनने सुब्रमण्यम उमेदवारी दिल्याबद्दल सुब्रमण्यम यांचे अभिनंदन केले होते. असोसिएशनचे कार्यवाहक अध्यक्ष अब क्रूझ म्हणाले की सुब्रमण्यम एक अनुभवी वकील आहेत, त्यांच्याकडे निःस्वार्थ सेवेची भावना आहे आणि ते पूर्ण समर्पित होऊन काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.